वाहनांच्या घुसखोरीने धोका

By Admin | Updated: July 10, 2015 01:43 IST2015-07-10T01:43:51+5:302015-07-10T01:43:51+5:30

गतिमान व सुरक्षित प्रवासाची हमी देणारा यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्ग त्यावरील सुरक्षा कुंपण तोडून होत असलेल्या धोकादायक घुसखोरीमुळे धोकादायक वाटू लागला आहे.

Vehicle infiltration risk | वाहनांच्या घुसखोरीने धोका

वाहनांच्या घुसखोरीने धोका

तळेगाव स्टेशन : गतिमान व सुरक्षित प्रवासाची हमी देणारा यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्ग त्यावरील सुरक्षा कुंपण तोडून होत असलेल्या धोकादायक घुसखोरीमुळे धोकादायक वाटू लागला आहे.
द्रुतगती महामार्गावर निर्धास्तपणे वाहन चालवावे अशी परिस्थिती सध्या राहिलेली नाही. कारण आजुबाजूच्या खुश्कीच्या घुसखोरीच्या मार्गाने कोण कधी अचानक समोर येईल, याची शाश्वती राहिलेली नाही. रावेतपासून सुरू होणारा ९४.५ किमी लांबीचा हा जलद, सुरक्षित व निर्धास्त प्रवासाकरिता नावाजला गेलेला द्रुतगती महामार्ग आता अपघात व असुरक्षितता यासाठी गाजत आहे. याला आयआरबी कंपनी आणि वाहतूक पोलिसांच्या ढिलेपणाबरोबरच बेशिस्त चालक आणि मार्गालगतचे स्थानिक रहिवासी कारणीभूत आहेत. या सर्वांचा निष्काळजीपणा स्वत:बरोबरच इतरांच्याही मृत्यूस कारणीभूत ठरतो आहे. सुस्थितीत नसलेली वाहने, रिफ्लेक्टर वा इंडिकेटर नसलेले ट्रेलर व ट्रक, लेन तोडून चालणारे बेदरकार चालक, अतिवेग, रस्त्यावर अडथळा येईल अशी वाहने थांबविणे ही मुख्य कारणे द्रुतगती मार्गावरील बहुतांश अपघातांमागे आहेत. तरी मार्गाशेजारचे सुरक्षाकुंपण भेदून दुचाकीस्वार, टोल चुकविणारी छोटी-मोठी वाहने व पाळीव प्राणी अचानक समोर प्रकट होतात तेव्हा काळजाचा ठोका चुकल्याशिवाय राहत नाही.
या महामार्गावर कोठेही थांबण्यास बंदी असताना लगत उभे केलेले क्रेन, अडथळा होईल या पद्धतीने टोलनाक्यासमोर तासन्तास उभे राहणारे वाहनचालक, मोकाट व बिनधास्त विहार करणारे दुचाकीस्वार, टोलनाक्यासमोरून रस्ता ओलांडण्यासाठी अचानक वळणारी वाहने, विरुद्ध बाजूने येणारे बेशिस्त वाहनचालक या व अशा प्रकारच्या निष्काळजीपणाचा कळस सध्या अपघातास कारणीभूत ठरत आहे.
उर्से टोलनाक्यावर दोन्ही बाजूला रस्त्याच्या मुख्य लेनवर, पोलीस चौकीसमोरच अनेक छोटी-मोठी वाहने तासन्तास धोकादायक पद्धतीने उभी केलेली ना समोरच्या महामार्ग पोलिसांना दिसतात ना डेल्टा फोर्सला ना आयआरबीवाल्यांना. टोलनाक्यावर उलट दिशेने गाडी घुसवून अचानक वळणाऱ्या वाहनचालकांना आयआरबीवाले आपत्कालीन गेट उघडून रस्ता देतात.
द्रुतगती महामार्गालगत असणाऱ्या मावळ तालुक्यातील गहुंजे, उर्से, ओझर्डे, बऊर, ब्राह्मणवाडी, पिंपळोली, सडवली, आढे, बोरज या गावांतील स्थानिकांनी स्वत:च्या सोईसाठी ठिकठिकाणी कुंपण तोडून महामार्गावर घुसण्यासाठी रस्ते पाडले आहेत. या खुश्कीच्या मार्गावरून अचानक समोर अवतरणारे दुचाकीस्वार आणि इतर छोटी-मोठी वाहने भीषण अपघातास कारणीभूत ठरत आहेत. (वार्ताहर)

कर्मचाऱ्यांकडूनही नियमांचे उल्लंघन
> आयबारबी, डेल्टा फोर्समध्ये काम करणारे बरेचसे कर्मचारी हे द्रुतगती मार्गालगतच्या गावातील आहेत. ते सर्रास अशी घुसखोरी करताना दिसतात. त्यामुळे महामार्गावरून टोल भरून प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांची सुरक्षा रामभरोसे आहे. आयआरबी, डेल्टा फोर्स व पोलीस यापैकी कारवाईसाठी मांजराच्या गळ्यात घंटा कोण बांधणार, असा प्रश्न आहे. आता सार्वजनिक बांधकाम खाते व महामार्ग प्राधिकरणानेच यासाठी आयआरबीवर दबाव आणायला हवा आणि असे मार्ग त्वरित बंद करून पोलिसांनी नियमांची कडक अंमलबजावणी करणे गरजेचे आहे.
> सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी दोनच दिवसांपूर्वी द्रुतगती मार्गावरील धोकादायक ठिकाणांची पाहणी करून उपाययोजना करण्याचे आदेश आयआरबीला दिले आहेत. त्यात ही धोकादायक ठिकाणे असायला हवीत, अशी प्रवाशांना अपेक्षा आहे.

Web Title: Vehicle infiltration risk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.