आवक वाढल्याने भाज्या उतरल्या
By Admin | Updated: January 23, 2017 02:25 IST2017-01-23T02:25:09+5:302017-01-23T02:25:09+5:30
गुलटेकडी येथील मार्केट यार्डात रविवारी शेतमालाची मोठ्या प्रमाणात आवक झाली. त्यामुळे बहुतेक फळभाज्यांचे भाव उतरले

आवक वाढल्याने भाज्या उतरल्या
पुणे : गुलटेकडी येथील मार्केट यार्डात रविवारी शेतमालाची मोठ्या प्रमाणात आवक झाली. त्यामुळे बहुतेक फळभाज्यांचे भाव उतरले आहेत. रविवारी बाजारात १५० ते १६० ट्रक शेतमालाची आवक झाली.
आले, टोमॅटो, दोडका, दुधी भोपळा, चवळी, काकडी, कोबी, वांगी, ढोबळी मिरची, शेवगा, घेवडा, पावटा या भाज्यांच्या भावात घट झाली. इतर भाज्यांच्या भावात फारसा चढउतार झाला नाही. पालेभाज्या कोथिंबीर व मेथीची आवक तुलेनेने वाढल्याने भाव घटले. रविवारी कोथिंबीरची आवक सुमारे २ लाख जुडी, तर मेथीची सुमारे ५० हजार जुडी आवक झाली. कोथिंबीरला शेकडा जुडीमागे ३०० ते ६०० रुपये तर मेथीला ५०० ते ८०० रुपये भाव मिळाला. फळभाज्यांमध्ये कांद्याच्या भावातही काहीशी घट झाली. कांद्याला प्रति दहा किलो ५० ते ७५ रुपये भाव मिळाला. सातारी आले १२० ते १५०, भेंडी २५०-३५०, गवार ४०० ते ५००, टोमॅटो ३०-६०, हिरवी मिरची १८० ते २००, फ्लॉवर ५० ते ८०, कोबी २० ते ५०, वांगी ८० ते १२०, मटारला १५० ते २०० भाव मिळाला.
साबुदाणा, तांदळाच्या भावात वाढ
पुणे : उत्पादनात घट झाल्याने घाऊक बाजारात साबुदाण्याची आवक रोडावली आहे. त्यामुळे भावात तेजी असून त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. तसेच तांदळाचे भावही वाढले असून शेंगदाणा उतरला आहे. गुलटेकडी येथील मार्केट यार्डात मागील आठवडाभरात मागणीच्या तुलनेत साबुदाण्याची आवक कमी झाली. त्यामुळे भावात क्विंटलमागे ७०० रुपयांची वाढ झाली आहे. तर आंबेमोहोर, कोलम, लचकारी कोलम या नवीन तांदळाची आवक कमी होत असल्याने भावात सुमारे ४०० ते ५०० रुपये वाढ झाली. मागणी कमी झाल्याने शेंगदाण्याचे भाव १०० ते १५० रुपयांनी उतरले. हरभराडाळ व तूरडाळीचे भाव मागील आठवडाभर स्थिर राहिले. बेसनाचे भाव ५० किलोमागे १०० रुपयांनी वाढले. मागील महिनाभरापासून तेजीत असलेले गुळाचे भाव आठवडाभर टिकून राहिले. खाद्यतेल, गोटा खोबरे व नारळाचे भावही तेजीत आहेत. इतर वस्तूंचे भाव स्थिर राहिले.