भाज्याही कडाडल्या
By Admin | Updated: June 3, 2017 02:03 IST2017-06-03T02:03:50+5:302017-06-03T02:03:50+5:30
शेतकरी संपाचा फटका शहराला बसू लागला असून, शुक्रवारी संपाच्या दुसऱ्या दिवशी मोठा तुटवडा जाणवू लागल्याने सर्वच भाज्यांचे

भाज्याही कडाडल्या
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : शेतकरी संपाचा फटका शहराला बसू लागला असून, शुक्रवारी संपाच्या दुसऱ्या दिवशी मोठा तुटवडा जाणवू लागल्याने सर्वच भाज्यांचे भाव कडाडले. त्यातच शनिवारी बाजार बंद असल्याने पुणेकरांवर भाज्यांसाठी वणवण फिरणे भाग पडणार आहे. तसेच भाजी मिळाल्यास त्यासाठी खिसा रिकामा करण्याची तयारीही ठेवावी लागणार आहे.
गुलटेकडी येथील मार्केट यार्डातून शहराची भाज्यांची भूक भागविली जाते. शहरालगतही बाजार असून उपनगरांमध्ये तिथून किरकोळ विक्रेत्यांमार्फत भाजी खरेदी केली जाते. मात्र, दोन दिवसांपासून सुरू असलेल्या शेतकरी संपामुळे सर्वच बाजार ओस पडू लागले आहेत. शेतकऱ्यांकडून बाजारात भाजीपालाच आणला जात नसल्याने बुहतेक भाज्यांचे भाव दुपटीने वाढले आहेत. गुलटेकडी मार्केट यार्डात शुक्रवारी केवळ १३ टक्के शेतमालाची आवक झाली. सर्वसाधारपणे दररोज बाजारात ४० हजार ५१० क्विंटल फळे व भाजीपाल्याची आवक होत असते. शुक्रवारी हे प्रमाण केवळ ५ हजार ३६१ क्विंटल होते. भुसार बाजारातील आवकही ६० टक्क्यांनी कमी झाली आहे. तर फुलबाजारात केवळ २३ टक्के फुलांची आवक झाली. यांसह पिंपरी बाजार, मोशी बाजार, उत्तमनगर, खडकी आणि मांजरी उपबाजार या सर्व घाऊक बाजारांमध्ये शुक्रवारी केवळ २२ टक्के शेतमालाची आवक झाल्याचे पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीकडून सांगण्यात आले.
घाऊक बाजारात आवक कमी झाल्याने किरकोळ बाजारात सर्वच भाज्यांचे भाव कडाडले आहेत. शुक्रवारी मागणीच्या तुलनेत आवक खूपच कमी झाल्याने किरकोळ विक्रेत्यांनाही चढ्या भावाने खरेदी करावी लागली. तसेच सर्व विक्रत्यांनाही भाजी मिळू शकली नाही. त्यामुळे किरकोळ बाजारात ग्राहकांना भाज्यांसाठी खिसा रिकामा करावा लागत असल्याचे चित्र शुक्रवारी दिसून आले. त्यातच शनिवारी मार्केट यार्ड साप्ताहिक सुट्टीमुळे बंद राहणार असल्याने आवकही पूर्णपणे थांबणार आहे.
महात्मा फुले मंडईमध्ये किरकोळ विक्रेत्यांकडे सर्व भाज्या उपलब्ध आहेत. मात्र, संपामुळे भाज्यांची आवक कमी झाल्याने भाव काही प्रमाणात वाढले आहेत. दोन दिवस हीच स्थिती राहिल्यास आणखी भाववाढ होण्याची शक्यता आहे.
- राजाभाऊ कासुर्डे, अध्यक्ष, महात्मा फुले व्यापारी संघटना
दर शुक्रवारी साधारण १०० ते १२० गाड्या शेतमालाची आवक होत असते. पण संपामुळे ही आवक १० टक्क्यांवर आली आहे. त्यामुळे भाज्यांच्या भावात दुपटीने वाढ झाली आहे. काही किरकोळ विक्रेत्यांनाही भाज्या मिळाल्या नाही. काहींनी विक्री बंद ठेवली आहे.
- विलास भुजबळ,
ज्येष्ठ व्यापारी,मार्केट यार्ड
शेतकऱ्यांकडून थेट विक्री
शेतकरी संपामुळे घाऊक बाजारात थेट माल विक्रीसाठी आणता येत नसल्याने काही शेतकऱ्यांकडून किरकोळ विक्रेत्यांना थेट विक्री केली जात असल्याचे दिसून आले. महात्मा फुले मंडईसह शहराच्या विविध भागांत शेतकऱ्यांकडून शुक्रवारी काही प्रमाणात शेतमाल आणण्यात आल्याचे किरकोळ विक्रेत्यांनी सांगितले. शुक्रवारी मार्केट यार्डातील बाजार बंद असल्याने शेतकरी किरकोळ विक्रेत्यांशी संपर्क साधून विचारणा करीत आहेत. काही शेतकरी विक्रेत्यांना थेट शेतातून माल घेऊन जाण्याची विनंती करीत आहेत. मात्र, विक्रेत्यांकडून भीतीने त्याला नकार दिला जात आहे. तर काही शेतकरी वाहनामध्ये माल झाकून विक्रीसाठी आणत होते.