भाजीपाल्याची विक्रमी आवक
By Admin | Updated: August 24, 2015 02:50 IST2015-08-24T02:50:14+5:302015-08-24T02:50:14+5:30
पावसाने पाठ फिरवलेली असतानाही भाजीपाल्याचे उत्पादन चांगले होत असल्याचे रविवारी घाऊक बाजारात पाहायला मिळाले. गुलटेकडी येथील मार्केट यार्डात रविवारी

भाजीपाल्याची विक्रमी आवक
पुणे : पावसाने पाठ फिरवलेली असतानाही भाजीपाल्याचे उत्पादन चांगले होत असल्याचे रविवारी घाऊक बाजारात पाहायला मिळाले. गुलटेकडी येथील मार्केट यार्डात रविवारी भाजीपाल्याची हंगामातील विक्रमी आवक झाली. त्यामुळे बहुतेक भाज्यांचे भाव १० ते २० टक्क्यांनी घटले.
जिल्ह्याच्या अनेक भागात अद्याप पुरेसा पाऊस झालेला नाही. त्यामुळे दुष्काळसदृश स्थिती निर्माण झाल्याचे चित्र आहे. पण रविवारी बाजारात झालेली आवक पाहता शेतकऱ्यांनी भाजीपाल्याची लागवड मोठ्या प्रमाणात केल्याचे दिसते. सततच्या पाण्याच्या कमतरतेमुळे अनेक शेतकऱ्यांनी ठिबक सिंचनाचा पर्याय स्वीकारला आहे. तसेच काही शेतकरी उपलब्ध पाण्यानुसार इतर पिकांपेक्षा भाजीपाल्याची लागवडच करीत आहेत. त्यामुळे सध्या तरी बाजारात पुरेसा भाजीपाला येत आहे, असे व्यापारी विलास भुजबळ यांनी सांगितले.
दरम्यान, रविवारी मार्केटयार्डात सुमारे २५० ट्रक भाजीपाल्याची आवक झाली. मागील आठवड्यात ही आवक १७० ते १८० ट्रक एवढीच होती. भाजीपाला घेऊन आलेले टेम्पो सकाळी १० वाजेपर्यंत जागेअभावी खाली करण्यात आले नव्हते. त्यामुळे या मालाला खूप कमी भाव मिळाला. आवक वाढल्याने बहुतेक भाज्यांचे भाव १० ते २० टक्क्यांनी घटले. मागील आठवड्याच्या तुलनेत घेवडा व हिरवी मिरचीच्या भावात प्रतिदहा किलोमागे सुमारे १०० रुपयांची घट झाली. पालेभाज्यांमध्ये कोथिंबीर, मेथीसह इतर भाज्यांचे भाव स्थिर राहिले. बाजारात कोथिंबीर व मेथीची अनुक्रमे सव्वा लाख व ४० हजार जुडी आवक झाली.
बाजारात परराज्यातून कर्नाटक व मध्य प्रदेशातून १४ ते १५ टेम्पो हिरवी मिरची, आंध्र प्रदेश व तमिळनाडू येथून ५ ते ६ टेम्पो शेवगा, इंदौर, कर्नाटक व उटी येथून १ टेम्पो गाजराची आवक झाली. बाजारात पहिल्यांदाच उटी येथून गाजराची आवक झाली आहे. तसेच कर्नाटक येथून ५ ते ६ ट्रक कोबी, इंदौर व आग्रा येथून ५५ ते ६० ट्रक बटाटा आणि मध्य प्रदेशातून सुमारे अडीच हजार गोणी लसणाची आवक झाली. पुणे विभागातून वाई, सातारा, पुरंदर व पारनेर येथून सुमारे ३ हजार गोणी मटार, ६०० गोणी सातारी आले, ६ ते ६.६ हजार पेटी टोमॅटो, ४ ते ५ टेम्पो हिरवी मिरची, २० ते २२ टेम्पो फ्लॉवर, १८ ते २० टेम्पो कोबी, १४ ते १५ टेम्पो सिमला मिरची, ७ ते ८ टेम्पो शेवगा, १०० ते १२५ गोणी भुईमूग शेंग, १० ते १२ टेम्पो तांबडा भोपळा आणि १० ते १२ टेम्पो राजमा घेवड्याची आवक झाली. (प्रतिनिधी)