जलशिवार योजना पुरंदरला वरदान
By Admin | Updated: September 22, 2015 03:21 IST2015-09-22T03:21:52+5:302015-09-22T03:21:52+5:30
जलयुक्त शिवार योजनेंतर्गत पुरंदर तालुक्यात करण्यात आलेले बहुतांश बंधारे पावसाच्या पाण्याने तुडुंब भरल्याने ही योजना पुरंदरसारख्या दुष्काळी तालुक्याला वरदान ठरली असल्याचे चित्र आहे

जलशिवार योजना पुरंदरला वरदान
नारायणपूर : जलयुक्त शिवार योजनेंतर्गत पुरंदर तालुक्यात करण्यात आलेले बहुतांश बंधारे पावसाच्या पाण्याने तुडुंब भरल्याने ही योजना पुरंदरसारख्या दुष्काळी तालुक्याला वरदान ठरली असल्याचे चित्र आहे.
या अभियानांतर्गत तालुक्यात ३०९ कामे मंजूर झालेली असून त्यापैकी तब्बल १९० कामे पूर्ण झाली आहेत. राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी आज या कामांची तालुक्यातील गावोगावी जाऊन पाहणी केली. अनेक बंधारे तुडुंब भरून वाहत असल्याचे पाहून शिवतारे यांनी समाधान व्यक्त केले. पुरंदर तालुक्यातील दिवे, सोनोरी, पानवडी, सटलवाडी, एखतपूर-मुंजवडी, साकुर्डे, काळदरी, देवडी, हिवरे, मांढर, टेकवडी, परिंचे, गुळुंचे, नावळी, वाळूंज, नवलेवाडी, पिंगोरी, वाल्हा, तक्रारवाडी, शिवरी, पांडेश्वर आदी गावांचा या योजनेत समावेश आहे. या गावांमध्ये नवीन सिमेंट बंधारे, गाळ काढणे, खोलीकरण करणे, बंधारा दुरुस्ती करणे, बांध-बंदिस्ती अशी अनेकविध स्वरूपाची कामे हाती घेण्यात आली आहेत.
शिवतारे म्हणाले, की दुष्काळमुक्तीसाठी १९६२नंतर अनेक आयोग नेमले गेले; पण त्यांच्या शिफारसी बासनात गुंडाळण्यात आल्या. या सगळ्या बाबींचा अभ्यास करून अशोक चव्हाण मुख्यमंत्री असताना, मी ही योजना शासनाला सुचवली होती. प्रायोगिक तत्त्वावर पुरंदर तालुक्यात ही योजना राबवावी आणि यश पाहून नंतर राज्यात हा पॅटर्न राबवावा, असेही मी सुचवले होते. शासनाने त्या वेळी उदासीनता दाखवली; मात्र राज्यात युतीचे सरकार आल्यावर ही योजना प्रामुख्याने हातात घेण्यात आली.
राज्यभर त्याचे यश दिसत असून, अनेक गावे जलयुक्त होत आहेत. भूगर्भातील पाणीसाठा वाढण्यासाठी याची मोठी मदत झाली आहे. सत्ता गेल्यामुळे कामधंदा न उरलेले अनेक उतावीळ विरोधक माझ्यावर टीका करत होते. त्यांना माझी कामगिरी हेच उत्तर असेल असेही शिवतारे म्हणाले.