अंगारकी चतुर्थीनिमित्त वडगाव काशिंबेग येथे विविध कार्यक्रम
By Admin | Updated: February 14, 2017 01:31 IST2017-02-14T01:31:25+5:302017-02-14T01:31:25+5:30
अंगारकी संकष्टी चतुर्थीनिमित्त वडगाव काशिंबेग येथील श्री स्वयंभू मोरया अर्धपीठ गणपती देवस्थान तीर्थक्षेत्रात मंगळवारी (दि. १४) विविध कार्यक्रमांचे आयोजन

अंगारकी चतुर्थीनिमित्त वडगाव काशिंबेग येथे विविध कार्यक्रम
मंचर : अंगारकी संकष्टी चतुर्थीनिमित्त वडगाव काशिंबेग येथील श्री स्वयंभू मोरया अर्धपीठ गणपती देवस्थान तीर्थक्षेत्रात मंगळवारी (दि. १४) विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. वर्षभरानंतर आलेल्या या वर्षीच्या पहिल्या अंगारकी संकष्टी चतुर्थीला भाविकांची गर्दी होणार असून, त्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
वडगाव काशिंबेग येथील अर्धपीठ गणपती देवस्थानात मंगळवारी अंगारकी संकष्टी चतुर्थीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. मागील वर्षी एकही अंगारकी संकष्टी चतुर्थी नव्हती. वर्षभरानंतर या वर्षाची पहिली अंगारकी संकष्टी चतुर्थी असल्याने भाविकांची दर्शनासाठी गर्दी होणार आहे. अर्धपीठ देवस्थानात पहाटे महापूजा, अभिषेक व आरती होणार आहे. दर्शनासाठी भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता देवस्थान ट्रस्टने सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. मंदिराच्या पायथ्यापासून एकेरी दर्शनरांग बॅरिकेड्स लावून बनविण्यात आली आहे.
मंदिर परिसरात मंडप उभारण्यात आला असून दुपारच्या वेळी उन्हापासून संरक्षण व्हावे, यासाठी मंडप दर्शनरांगेपर्यंत टाकण्यात आला. सुरक्षेसाठी खासगी सुरक्षारक्षकांबरोबर मंचर पोलीस ठाण्याचे कर्मचारी तैनात असणार आहेत. सायंकाळी सर्वाधिक गर्दी होते. त्यामुळे वाहनांची पार्किंग बाजूला केली जाणार आहे. दुपारी व सायंकाळी महाआरती होईल. भाविकांना प्रसाद व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली जाणार असल्याची माहिती श्री स्वयंभू मोरया अर्धपीठ गणपती देवस्थान ट्रस्टच्या वतीने देण्यात आली.
(वार्ताहर)