वारीची पताका फडकली थेट लंडनमध्ये..!
By Admin | Updated: July 9, 2015 02:46 IST2015-07-09T02:46:33+5:302015-07-09T02:46:33+5:30
महाराष्ट्राच्या संस्कृतीचे आणि एकात्मतेचे दर्शन घडवणाऱ्या वारीची पताका थेट लंडनच्या आॅक्सफर्ड विद्यापीठात फडकली आहे.

वारीची पताका फडकली थेट लंडनमध्ये..!
सायली जोशी, पुणे
महाराष्ट्राच्या संस्कृतीचे आणि एकात्मतेचे दर्शन घडवणाऱ्या वारीची पताका थेट लंडनच्या आॅक्सफर्ड विद्यापीठात फडकली आहे.
आॅक्सफर्ड विद्यापीठातील इंटरडिसिप्लिनरी डॉट नेट या संस्थेअंतर्गत ग्लोबल कॉन्फरन्स आॅन पिलग्रीमिनेज (यात्रा) या विषयावर आयोजित परिषदेत ठाण्यातील वरदा संभूस या विद्यार्थिनीने वारी हा विषय केंद्रस्थानी धरून एक शोधप्रबंध नुकताच सादर केला आहे. वरदा ही सध्या जवाहरलाल नेहरूविद्यापीठात राज्यशास्त्र विषयात पीएच.डी. करीत आहे. महाराष्ट्राच्या संस्कृतीत आणि समाजात वारीचे मराठी मनातील अनन्यसाधारण स्थान अधोरेखित करतानाच तिने महाराष्ट्रातील राजकारण, समाजव्यवस्था आणि त्यावर असणारा वारीचा प्रभाव यांचे अभ्यासपूर्ण विश्लेषण करून ते सातासमुद्रापार नेऊन मांडले आहे.
जगभरात विविध कारणांनी आयोजित केल्या जाणाऱ्या यात्रांचा तेथील समाजावर होणारा परिणाम याविषयाचा ऊहापोह व साकल्याने अभ्यास करण्यासाठी ही आंतरराष्ट्रीय परिषद दिनांक ३ ते ५ जुलैदरम्यान आयोजित करण्यात आली होती. त्यात एकूण १८ देशांतील ३५ प्रतिनिधींनी आपले रिसर्च पेपर सादर केले होते.
वारीच्या माध्यमातून राज्यभरातले अठरापगड जातींचे लोक एकत्र येतात व त्याचा समाजावर कसा परिणाम होतो व त्याचे ऐतिहासिक संदर्भ काय, हा विषय वरदाने यात मांडला.
१३ व्या शतकात जात, स्त्रियांचे समाजातील स्थान, अस्पृश्यता, कर्मकांड यांबाबत समाजात मोठ्या प्रमाणात चळवळ चालू होती.
या काळात लोकांवर जात, धर्म, पंथ या गोष्टींचा मोठा पगडा होता. परंतु लोक आपापल्या पद्धतीने जीवन जगत होते. त्यांना खऱ्या अर्थाने एकत्र आणण्याचे काम आपल्या संतांनी केले असून, त्याचा पाया ज्ञानेश्वरांनी रचला आहे, अशी भूमिका या रिसर्च पेपरमधून तिने मांडली आहे.
वैष्णवांची पताका ब्रिटिशांच्या दारी
भारतात ब्रिटिश राजवटीनंतर न्याय, समता-बंधुता, लोकशाही या आधुनिक संकल्पना उदयास आल्या, असा आजही समज आहे. परंतु प्रत्यक्षात तसे नसून ही आधुनिकता भारतात आणि विशेषत: महाराष्ट्रात आधीपासूनच अस्तित्वात होती. त्याचा परिपाक म्हणजे वारी आहे, हेच मी माझ्या अभ्यासातून मांडले.
- वरदा संभूस, राज्यशास्त्र अभ्यासिका