पुणे-सोलापूर महामार्गाच्या कडेला उभी राहणार वनराई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:12 IST2021-09-21T04:12:24+5:302021-09-21T04:12:24+5:30
हेंकेल कंपनीचा उपक्रम ; पाटस टोल नाका ते कुरकुंभ पाचशे झाडांची लागवड कुरकुंभ : औद्योगीकरण व पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी ...

पुणे-सोलापूर महामार्गाच्या कडेला उभी राहणार वनराई
हेंकेल कंपनीचा उपक्रम ; पाटस टोल नाका ते कुरकुंभ पाचशे झाडांची लागवड
कुरकुंभ : औद्योगीकरण व पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी हेंकेल कंपनीच्या पुढाकाराने पुणे- सोलापूर महामार्गावर पाटस टोल नाका ते कुरकुंभ अशा जवळपास आठ किलोमीटर अंतरात वृक्षलागवड करण्याचा उपक्रम राबविण्यात येणार आहे. त्याची सुरुवात नुकतीच पांढरेवाडीच्या सरपंच छाया झगडे यांच्या हस्ते करण्यात आली.
रासायनिक प्रकल्पामुळे कुरकुंभ औद्योगिक क्षेत्रातील वाढत्या प्रदूषणाच्या समस्या तसेच नूतनीकरणानंतर महामार्गावरील तोडण्यात आलेल्या झाडांमुळे परिसरात सावलीच्या झाडांचा अभाव अनेक वर्षे दिसत आहे. आजवर अनेक कंपनीच्या माध्यमातून वृक्षारोपण करण्यात आले असून, औद्योगिक क्षेत्रातील मोकळ्या जागेचा यासाठी वापर करण्यात आला आहे. त्यामुळे कुरकुंभ ते पाटस असा औद्योगिक क्षेत्राशी निगडित असणाऱ्या महामार्गाच्या सेवा रस्त्याच्या दुतर्फा ही वृक्षलागवड करण्यात येणार असल्याची माहिती कंपनीचे अधिकारी प्रसाद खंडागळे यांनी दिली.या प्रसंगी हेंकेल कंपनीचे अधिकारी गणेश नायक,सुधीर शिनोय,भुपेश सिंह,योगेश पाटील तर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अधिकारी सुरजीत सिंह,सुनील तिवारी आदी होते.
दरम्यान, या उपक्रमात राष्ट्रीय महामार्गाच्या सहकार्याने सेवा रस्त्याच्या कडेने जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे.महामार्गाच्या नूतनीकरणात दुभाजकामध्ये सुशोभीकरणाच्या झाडांना प्राधान्य देण्यात आले होते. या उपक्रमाच्या साह्याने मोठ्या स्वरुपातील वनराई परत उभारण्यास मदत होणार आहे.या झाडांची देखभाल दोन वर्षे कंपनीच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.
--
चौकट
कचरा व अतिक्रमणांचा अडथळा
--
कुरकुंभ ते पाटस दरम्यान सेवा रस्त्यावर काही ठिकाणी अतिक्रमण, तर औद्योगिक क्षेत्रात अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढिगारे झालेले आहेत, याचे नियोजन करूनच झाडांची निगा राखणे शक्य होणार आहे. तसेच कुरकुंभ परिसरात रस्त्याच्या कडेला असणाऱ्या रासायनिक पाण्याचे आव्हान अडथळा बनून समोर असल्याने या समस्या सोडवणे अत्यंत आवश्यक असणार आहे.