समाजात मूल्यव्यवस्था रुजविली जावी
By Admin | Updated: February 2, 2016 00:49 IST2016-02-02T00:49:20+5:302016-02-02T00:49:20+5:30
स्वार्थी, उपभोगवादी, चंगळवादी वृत्ती समाजात वाढत आहे. माणसे संवेदनाहीन झाली आहेत, मनाचा कुष्ठरोग झालेला आहे

समाजात मूल्यव्यवस्था रुजविली जावी
पुणे : स्वार्थी, उपभोगवादी, चंगळवादी वृत्ती समाजात वाढत आहे. माणसे संवेदनाहीन झाली आहेत, मनाचा कुष्ठरोग झालेला आहे. शिक्षण, गरिबी अशा प्रश्नांविरोधात आज आवाज उठविला जात नाही. दिवसेंदिवस विषमतेची दरी वाढते आहे. समतेची विटंबाना होताना दिसत आहे. बंधुता एका कुटुबांत तरी आहे की नाही, असा प्रश्न निर्माण होतो. समता, बंधुता, मूल्यव्यवस्था रुजविण्यासाठी साहित्यिकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन ज्येष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य यांनी केले.
राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषद आणि बंधुता प्रतिष्ठान आयोजित १७व्या राष्ट्रीय बंधुता संमेलनात रविवारी वैद्य यांना राष्ट्रीय बंधुता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. एस. एम. जोशी सभागृहात झालेल्या समारोप संमेलनास प्रमुख पाहुणे म्हणून संत साहित्याचे अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे, संमेलनाच्या अध्यक्षा ज्येष्ठ साहित्यिका डॉ. अश्विनी धोंगडे, स्वागताध्यक्षा मधुश्री ओव्हाळ, डॉ. विकास आबनावे, डॉ. अशोक पगारिया, प्रकाश रोकडे, शंकर अत्रे आदी व्यासपीठावर होते.
माजी उपशिक्षणाधिकारी सुधाकर तांबे, सहायक आरोग्याधिकारी प्रकाश जवलकर, डॉ. भीम गायकवाड, विजयकुमार मर्लेचा, धम्मचारी ज्ञानदूत यांना राज्यस्तरीय बंधुता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. डॉ. अश्विनी धोंगडे यांनी अध्यक्षीय समारोप केला. (प्रतिनिधी)