- नारायण बडगुजर, पिंपरी वैष्णवी हगवणे संशयास्पद मृत्यू प्रकरणी पोलिसांनी तपासाची चक्र वेगाने फिरवली असून, हगवणे कुटुंबाच्या नातेवाईक, मित्रपरिवारातील अनेक जणांची सखोल चौकशी सुरू केली आहे. यामध्ये पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष सुनील चांदेरे यांचीही चौकशी करून माहिती घेण्यात आली आहे.
राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवी हगवणे हिने १६ मे रोजी भुकूम येथील घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. छळामुळे आत्महत्या केल्याचा आरोप करत तिच्या वडिलांनी बावधन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
सासरा आणि दीर, दोघे अजून फरार
वैष्णवीचा पती शशांक, सासू लता आणि नणंद करिष्मा हगवणे यांना अटक झाली असून, सासरे राजेंद्र व दीर सुशील हगवणे हे फरार आहेत.
मित्र आणि नातेवाईकांच्या मागे चौकशीचा ससेमिरा
या प्रकरणातील फरार संशयितांचा ठावठिकाणा शोधण्यासाठी पोलीस विविध पथकांच्या माध्यमातून तपास करत आहेत. त्यांचा संपर्क कुणाशी झाला होता, लपण्यास कुणाची मदत झाली असावी, यासंदर्भात माहिती मिळवण्यासाठी नातेवाईक, ओळखीचे, राजकीय आणि व्यावसायिक वर्तुळातील व्यक्तींना चौकशीसाठी बोलावले जात आहे.
वाचा >>हगवणे कुटुंबीय हे माझे दूरचे नातेवाईक, वैष्णवीचे मामासासरे IG सुपेकरांनी मांडली बाजू
सुनील चांदेरे यांच्याकडेही चौकशी करताना विचारण्यात आले की, राजेंद्र किंवा सुशील हगवणे यांच्याशी त्यांचा प्रकरणानंतर काही संपर्क झाला होता का? त्यांनी चौकशीदरम्यान आपला जबाब नोंदवला असून, अधिक तपशील पोलीस तपासानंतर स्पष्ट होणार आहे.
दरम्यान, पोलीस तपास अधिक सखोल व वेगाने करत असून लपवाछपवी करणाऱ्यांवरही कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे संकेत पोलिस सूत्रांकडून देण्यात आले आहेत.
वैष्णवीच्या नातेवाईकांनी संशयितांवर खुनाच्या कलमा अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी लावून धरली आहे.
पोलीस आयुक्तालयात तातडीची बैठक
फरार संशयित राजेंद्र हगवणे याला अटक करणे हे पिंपरी-चिंचवड पोलिसांसाठी आव्हानात्मक बनले आहे. त्यामुळे गुरुवारी (२२ मे) पोलीस आयुक्तालयात यासंदर्भात तातडीची उच्चस्तरीय बैठक घेण्यात आली.
या बैठकीत आयुक्तालयातील सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला. स्थानिक पोलिसांबरोबरच गुन्हे शाखेची सर्व पथके राजेंद्र हगवणे आणि त्याचा मुलगा सुशील हगवणे यांच्या शोधासाठी रवाना करण्यात आली आहेत.
पाच पथके घेताहेत राजेंद्र हगवणेचा शोध
स्थानिक पोलिसांसोबतच पाच विशेष पथकेही वेगवेगळ्या दिशांनी शोध मोहीम राबवत आहेत. राजेंद्र हगवणे व सुशील हगवणे यांना लवकरच अटक करण्यात येईल, अशी माहिती पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी दिली.