वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण: गळफासासाठी वापरलेली साडी आणि पंखा ७१ किलो वजन पेलू शकतो का?

By नारायण बडगुजर | Updated: June 2, 2025 23:41 IST2025-06-02T23:38:52+5:302025-06-02T23:41:03+5:30

न्यायवैद्यक प्रयोगशाळेत होणार तपासणी, वैष्णवीने साडीने घरातील छताच्या पंख्याला गळफास घेतला. तिचे वजन ७१ किलो असल्याचे पंचनाम्यात नोंदविण्यात आले आहे

Vaishnavi Hagavane suicide case: Can the saree and fan used for hanging support a weight of 71 kg? | वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण: गळफासासाठी वापरलेली साडी आणि पंखा ७१ किलो वजन पेलू शकतो का?

वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण: गळफासासाठी वापरलेली साडी आणि पंखा ७१ किलो वजन पेलू शकतो का?

नारायण बडगुजर

पिंपरी : वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात बावधन पोलिसांकडून तपासाला वेग आला आहे. वैष्णवीने साडीच्या साह्याने घरातील पंख्याला गळफास घेतला होता. त्यामुळे साडी आणि पंखा मंगळवारी न्यायवैद्यक प्रयोगशाळेकडे (फाॅरेन्सिक लॅब) पाठवण्यात येणार आहे. संबंधित पंखा ७१ किलो वजन पेलू शकतो का, याची तपासणी होणार आहे.

वैष्णवी शशांक हगवणे (२३, रा. भुकूम, ता. मुळशी) हिने भुकूम येथे १६ मे रोजी घरात गळफास घेतला. याप्रकरणी १७ मे रोजी गुन्हा दाखल झाला. पोलिसांनी तिचा पती शशांक, सासरा राजेंद्र, सासू लता, दीर सुशील, नणंद करिष्मा हगवणे आणि सहआरोपी नीलेश चव्हाण याला अटक केली.

वैष्णवीने साडीने घरातील छताच्या पंख्याला गळफास घेतला. तिचे वजन ७१ किलो असल्याचे पंचनाम्यात नोंदविण्यात आले आहे. हे वजन पंखा पेलू शकतो किंवा नाही याची तपासणी करण्यासाठी साडी आणि पंखा न्यायवैद्यक प्रयोगशाळेत तपासण्यात येणार आहे. त्यासह नीलेश चव्हाण याच्याकडील लॅपटाॅप आणि मोबाइलही तपासण्यासाठी पाठवण्यात आले आहेत.

मैत्रिणीकडून धक्कादायक खुलासे?

पोलिसांनी सोमवारी नीलेश चव्हाण याच्या मैत्रिणीसह अन्य एका महिलेला चौकशीसाठी बोलावले होते. त्यांच्याकडे कसून चौकशी करण्यात आली असून यातून धक्कादायक खुलासे होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

तिघांना आज न्यायालयात हजर करणार

राजेंद्र आणि शशांक हगवणे या पितापुत्रासह नीलेश चव्हाणची पोलिस कोठडी संपत असल्याने मंगळवारी पुन्हा न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. आणखी तपासासाठी त्यांच्या कोठडीत वाढ करण्याची मागणी पोलिस करणार आहेत.

तो लॅपटाॅप माझा नाहीच..!

नीलेश चव्हाणच्या लॅपटाॅपमध्ये काही व्हिडीओ क्लिप असल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यामुळे पोलिसांनी तो जप्त केला. मात्र, तो माझा नाहीच, असे नीलेशने पोलिसांना सांगितले. पोलिसांनी हा लॅपटाॅप न्यायवैद्यक प्रयोगशाळेकडे पाठवला आहे. अहवाल आल्यानंतर लॅपटाॅमध्ये नेमके काय आहे, याचा उलगडा होणार आहे.

पती-सासूला महाळुंगे पोलिस आज घेणार ताब्यात

वैष्णवीचा पती शशांक आणि सासू लता यांच्याविरोधात आर्थिक फसवणूकप्रकरणी महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. याप्रकरणी चौकशीसाठी दोघांना ताब्यात देण्यात यावे, असा अर्ज न्यायालयाकडे गेला आहे. मंगळवारी न्यायालयीन प्रक्रियेनंतर दोघांना महाळुंगे पोलिस ताब्यात घेणार आहेत.

Web Title: Vaishnavi Hagavane suicide case: Can the saree and fan used for hanging support a weight of 71 kg?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.