पुणे -वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात अजून एक महत्त्वपूर्ण घडामोड समोर आली आहे. या प्रकरणातील आरोपींना वरिष्ठ पोलीस अधिकारी जालिंदर सुपेकर यांची मदत मिळत असल्याचा आरोप जोर धरू लागला आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या रूपाली ठोंबरे यांनी यावर थेट सुपेकर यांचं नाव घेत गंभीर आरोप केले आहेत.
या पार्श्वभूमीवर आज भाजप नेते गिरीश महाजन यांनी वैष्णवीच्या कुटुंबीयांची भेट घेतली. भेटीनंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी सुपेकर यांच्यावर होणाऱ्या आरोपांबाबत विचारलं असता, "जर सुपेकर यांनी मदत केली असेल आणि त्या संदर्भात ठोस पुरावे असतील, तर निश्चितच त्यांची चौकशी होईल," असं स्पष्ट आश्वासन दिलं.
महाजन यांनी पुढे सांगितले की, "कोणत्याही गुन्हेगारी प्रकरणात जर पोलीस अधिकारी आरोपींना पाठीशी घालत असतील, तर ते गंभीर आहे. अशा पोलीस अधिकाऱ्यांवरही कठोर कारवाई करण्यात येईल, असं आश्वासनही त्यांनी दिले.
दरम्यान, होत असलेल्या आरोपांमुळे जालिंदर सुपेकर यांनी माध्यमांसमोर आपली बाजू मांडत स्पष्टीकरण दिलं. त्यांनी सांगितलं, "हगवणे कुटुंबीय हे माझे दूरचे नातेवाईक आहेत, मात्र या प्रकरणाशी माझा काहीही संबंध नाही. गेल्या कित्येक महिन्यांपासून आमच्यात कोणताही संवादही झालेला नाही. माझ्याही दोन मुली आहेत आणि अशा निर्घृण प्रकाराचं समर्थन कोणताही बाप करू शकत नाही." सुपेकर यांनी आरोपींना योग्य शिक्षा मिळावी, हीच आपली स्पष्ट भूमिका असल्याचंही म्हटलं.
या सगळ्या घडामोडीमुळे आता संपूर्ण प्रकरण अधिकच गुंतागुंतीचं झालं असून, तपास यंत्रणांवर आणि शासनावरही चौकशीसाठी दबाव वाढत आहे. पुढील काही दिवसांत या प्रकरणात कोणती नवी माहिती समोर येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे."