सोळा ऐवजी आठच केंद्रांवर होणार लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 04:10 IST2021-01-14T04:10:37+5:302021-01-14T04:10:37+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : पालिकेने राज्य शासनाला पाठविलेल्या सोळा लसीकरण केंद्रांपैकी आठ केंद्र राज्य शासनाने निश्चित केले आहेत. ...

सोळा ऐवजी आठच केंद्रांवर होणार लसीकरण
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : पालिकेने राज्य शासनाला पाठविलेल्या सोळा लसीकरण केंद्रांपैकी आठ केंद्र राज्य शासनाने निश्चित केले आहेत. शासनाकडून पुण्यासाठी ६० हजार लसी बुधवारी पहाटे प्राप्त झाल्या असून १६ जानेवारीला प्रत्येक केंद्रावर १०० याप्रमाणे ८०० आरोग्य सेवकांना लस दिली जाणार असल्याची माहिती अतिरीक्त आयुक्त रुबल अगरवाल यांनी दिली.
लसीकरणाबाबत अगरवाल यांनी नियोजन बैठक घेतली. या बैठकीला आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते. पालिकेची सर्व तयारी पूर्ण झाली असून ६० हजार लसींपैकी ३० हजार लसी देण्यात येणार आहे. शहरातील खासगी आणि सरकारी रुग्णालयातील आरोग्य सेवकांचा यामध्ये समावेश आहे.
आरोग्य सेवकांना मोबाईल क्रमांकावर लसीकरणाबाबत संदेश दिला जाणार आहे. त्यानंतर लसीकरणासाठी जायचे आहे, अशा ८०० आरोग्य सेवकांना पहिल्या दिवशी लस दिली जाणार आहे. पहिल्या दिवशीच्या लसीकरणाची इत्थंभूत माहिती शासनाला पाठवावी लागणार आहे. या आरोग्य सेवकांवर लसीकरणाचे नेमके काय परिणाम होतात यावरही लक्ष ठेवले जाणार आहे. त्यानंतर लसीकरणाची पुढील तारीख निश्चित होणार आहे.
चौकट
या ठिकाणी होणार लसीकरण
राजीव गांधी हॉस्पीटल
कमला नेहरु रुग्णालय
ससून हॉस्पीटल
सुतार दवाखाना
दिनानाथ मंगेशकर रुग्णालय
रुबी हॉस्पीटल
भारती विद्यापीठ हॉस्पीटल
नोबेल हॉस्पीटल