खातरजमा न करताच काही खासगी रुग्णालयात लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 04:11 IST2021-03-14T04:11:02+5:302021-03-14T04:11:02+5:30
पुणे : शहरात एकीकडे महापालिकेला लस कमी पडत असल्याचे चित्र आहे. तर, दुसरीकडे काही खासगी रुग्णालयांकडून कोणतीही शहानिशा न ...

खातरजमा न करताच काही खासगी रुग्णालयात लसीकरण
पुणे : शहरात एकीकडे महापालिकेला लस कमी पडत असल्याचे चित्र आहे. तर, दुसरीकडे काही खासगी रुग्णालयांकडून कोणतीही शहानिशा न करता लसीकरण केले जात असल्याचे समोर आले आहे. ६० पेक्षा कमी वयाच्या नागरिकांना लस देताना त्यांना अन्य व्याधी असल्याचे प्रमाणपत्र द्यावे लागते. मात्र, या रुग्णालयांकडून हे प्रमाणपत्र न घेताच लस दिली जात असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
शहरात लसीकरणाला सुरुवात झाल्यानंतर पहिल्या टप्प्यात आरोग्यसेवक, दुसऱ्या टप्प्यात फ्रंटलाईन वर्कर्स यांना लस खुली करण्यात आली. त्याकरिता शासनाकडून महापालिकेला लस उपलब्ध करुन देण्यात आली. त्यानंतर, ६० वर्षांपुढील ज्येष्ठ नागरिक आणि ४५ वर्षांपुढील व्याधीग्रस्त नागरिकांना लस देण्यास परवानगी देण्यात आली. यंत्रणेवर ताण आल्याने पहिले दोन दिवस नागरिकांना लसीकरण केंद्रांवर अडचणींचा सामनाही करावा लागला होता.
दरम्यान, शहरातील खासगी रुग्णालयांना महापालिकेकडून लस देण्यास परवानगी देण्यात आली. पालिकेकडे लसींचा तुटवडा निर्माण झाला आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून लस घ्यावी लागली. या परिस्थितीमध्ये काही खासगी रुग्णालये मात्र नागरिकांना थेट लस देत असल्याचे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. लसीकरणासाठी नाव नोंदविणे आवश्यक आहे. परंतु, नागरिक या रुग्णालयांच्या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधून नाव नोंदवितात. त्यांची माहिती कोविनमध्ये भरली जाते. या नागरिकांकडून व्याधीग्रस्त असल्याचे प्रमाणपत्र घेणे आवश्यक आहे. परंतु, या रुग्णालयांकडून हे प्रमाणपत्र मागितले जात नसल्याचे नागरिकांकडून सांगण्यात आले.