पुरंदर तालुक्यात १५ हजार ९५४ लोकांचे लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:25 IST2021-09-02T04:25:36+5:302021-09-02T04:25:36+5:30
नीरा : पुरंदर तालुक्याला महालसीकरण मोहिमेअंतर्गत तब्बल १६ हजार लसींचे डोस देण्यात आले होते. आरोग्य कर्मचाऱ्यांच्या योग्य ...

पुरंदर तालुक्यात १५ हजार ९५४ लोकांचे लसीकरण
नीरा : पुरंदर तालुक्याला महालसीकरण मोहिमेअंतर्गत तब्बल १६ हजार लसींचे डोस देण्यात आले होते. आरोग्य कर्मचाऱ्यांच्या योग्य नियोजनामुळे तब्बल १५ हजार ९५४ जणांचे लसीकरण झाले. त्यामुळे एकाच दिवशी लसीकरणाचा उच्चांक गाठण्याचा विक्रम पुरंदर तालुक्यात झाल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. उज्ज्वला जाधव यांनी दिली.
मंगळवारी बजाज आणि पुणे जिल्हा परिषद यांच्या विद्यामाने महालसीकरण अभियान राबवण्यात आले. तालुक्याला आधी १५ हजार लस उपलब्ध झाली होती. दुपारनंतर लस कमी पडेल असा अंदाज घेऊन पुन्हा १ हजार लस जिल्हा जिल्हा आरोग्य विभागाकडून देण्यात आली. पुरंदर तालुक्यातील ४३ लसीकरण केंद्रांवर लसीकरणाची सोय तालुका आरोग्य विभागाने केली होती. ४२ लसीकरण केंद्रावरील लस संपली असे कोठेही झाले नाही व कमी पडली असे ही झाले नाही. ज्याठिकाणी लस कमी पडले त्या केंद्रावर शिल्लक असणाऱ्या केंद्रांवरून नियोजन करून लस पुरवण्यात आली. या मोहिमेत महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. ८ हजार ७७४ महिलांनी तर ७ हजार १८० पुरुषांनी लस घेतली. दुसरा डोस १ हजार २३७ लोकांनी घेतला.
पुरंदर तालुक्यातील विविध लसीकरण केंद्रांना बजाज ग्रुपच्यावतीने डॉ. अमन कौर, डॉ. शुभांगी, डॉ. अमित गुप्ता यांनी भेटी दिल्या. पुरंदरच्या तहसीलदार रूपाली सरनोबत यांनी ही ग्रामीण भागातील लसीकरण केंद्रावर भेटी दिल्या. या लसीकरणादरम्यान कोठेही गडबड गोंधळ उडाला नाही. सर्व टीमने अतिशय उत्कृष्ट पद्धतीने काम केल्यामुळे तसेच ग्रामस्थांनी मोलाचे सहकार्य दिल्याने कोठेही गडबड गोंधळ उडला नाही. लसीकरण शांततेत व शिस्तबद्ध पद्धतीने झाल्याने तालुका आरोग्य विभागाने समाधान व्यक्त केले.
---
फोटो क्रमांक : ०१ नीरा प्राथमिक आरोग्य केंद्र
फोटो ओळ : नीरा (ता. पुरंदर) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रावर दिवसभर महिलांची व पुरुषांच्या वेगवेगळ्या रांगा लागल्या होत्या. (छाया : भरत निगडे)