स्वर महोत्सव आजपासून
By Admin | Updated: December 10, 2015 01:39 IST2015-12-10T01:39:17+5:302015-12-10T01:39:17+5:30
गायन, वादन आणि नृत्याचा संगम असलेल्या ६३व्या सवाई गंधर्व-भीमसेन महोत्सवाला आजपासून (दि. १०) सुरुवात होत आहे.

स्वर महोत्सव आजपासून
पुणे : गायन, वादन आणि नृत्याचा संगम असलेल्या ६३व्या सवाई गंधर्व-भीमसेन महोत्सवाला आजपासून (दि. १०) सुरुवात होत आहे. प्रसिद्ध गायक पं. राजन-साजन मिश्रा, पं. जसराज, पं. उल्हास कशाळकर, मालिनी राजूरकर यासारख्या संगीतातील दिग्गज शिरोमणींसह सावनी कुलकर्णी, शिल्पा पुणतांबेकर, सुचिस्मिता दास, अमजद अली, भारती प्रताप या नव्या पिढीतील सात कलाविष्कारांचा सुरेल संगम यंदाच्या महोत्सवात रसिकांना अनुभवायला मिळेल.
आर्यसंगीत प्रसारक मंडळ आयोजित महोत्सवाच्या पहिल्या दिवसाची (दि. १०) सुरुवात पुण्याच्या नम्रता गायकवाड हिच्या सनईवादनाने होणार आहे. त्यानंतर गायक पं. भास्करबुवा बखले यांच्या परंपरेतील सावनी कुलकर्णी आणि शिल्पा पुणतांबेकर यांचे सहगायन रसिकांना ऐकता येणार आहे. किराणा घराण्याचे पं. विश्वनाथ यांचे गायन तसेच मल्हार कुलकर्णी यांचे शिष्य रूपक कुलकर्णी व प्रवीण शेवलीकर यांच्या बासरी व व्हायोलिन सहवादनानंतर ख्यातनाम गायक पं. राजन-साजन मिश्रा यांच्या गायनाने उत्तरार्धाची सांगता होईल. पतियाला घराण्याच्या गायिका सुचिस्मिता दास या युवा कलाकाराच्या गायनाने दुसऱ्या दिवसाचा (दि. ११) प्रारंभ होईल.
तिसऱ्या दिवसाची सुरुवात आग्रा घराण्याच्या गायिका भारती प्रताप यांच्या गायनाने होणार आहे. तसेच जयपूर घराण्याचे रघुनंदन पणशीकर यांचे गायन, प्रवीण गोडखिंडी यांचे बासरीवादन होणार आहे. त्यानंतर ज्येष्ठ नर्तक व दुर्गालाल यांच्या परंपरेतील राजेंद्र गंगाणी यांचा कथक नृत्याविष्कार रसिकांना अनुभवता येईल. ग्वाल्हेर, जयपूर आणि आग्रा अशा तिन्ही घराण्यांचे प्रतिनिधित्व करणारे गजानन बुवा यांचे शिष्य पं. उल्हास कशाळकर यांच्या गायनाने उत्तरार्धाची समाप्ती होईल.
महोत्सवाचा शेवटचा दिवस सकाळ आणि सायंकाळ अशा दोन सत्रात रंगणार आहे. सकाळच्या सत्रात पं. शौनक अभिषेकी यांचे गायन, ध्रुव घोष यांचे सारंगीवादन होईल. ज्येष्ठ गायिका मालिनी राजूरकर यांची अभिजात गायकी रसिकांना अनुभवायला मिळेल.
सायंकाळच्या सत्राची सुरुवात नानासाहेब देशपांडे यांच्या नातसून पद्मा देशपांडे यांच्या गायनाने होणार आहे. परंपरेप्रमाणे महोत्सवाचा समारोप किराणा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका डॉ. प्रभा अत्रे यांच्या गायनाने होईल.
(प्रतिनिधी)