बैलाऐवजी वाढला ट्रॅक्टरचा वापर

By Admin | Updated: June 17, 2014 03:09 IST2014-06-17T03:09:35+5:302014-06-17T03:09:35+5:30

मावळ तालुक्यामध्ये शेतीच्या मशागतीसाठी आता ट्रॅक्टरचा वापर वाढला असून बैलाने मशागत करण्याचे प्रमाण हळूहळू कमी होताना दिसत आहे

Use of tractor instead of oxen increased | बैलाऐवजी वाढला ट्रॅक्टरचा वापर

बैलाऐवजी वाढला ट्रॅक्टरचा वापर

आढले बुद्रुक : मावळ तालुक्यामध्ये शेतीच्या मशागतीसाठी आता ट्रॅक्टरचा वापर वाढला असून बैलाने मशागत करण्याचे प्रमाण हळूहळू कमी होताना दिसत आहे. आंदर मावळ, नाणेमावळ, पवन मावळ अशा तीन विभागांमध्ये मावळ तालुका विखुरला असून शहरीकरणाचा भाग सोडला तर प्रामुख्याने ग्रामीण भाग हा शेतीच्या व्यवसायावरच जास्त अवलंबून आहे.
पूर्वी बैलजोडीने शेताची संपूर्ण मशागत केली जात असे. परंतु आता ट्रॅक्टरने मशागत करण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. शेतीच्या मशागतीसाठी लागणारी जुनी लाकडी औजारे आता दुर्मिळ होताना दिसत आहे. तसेच वाढत्या बैलजोडीच्या किमतीमुळे देखील ट्रॅक्टरचे प्रमाण वाढले आहे. जमिनीची डागडुजी आणि नांगरणी आदी कामांसाठी आता शेतकरी ट्रॅक्टरचा वापर करू लागले आहेत. पूर्वी मोठे शेतकरी ट्रॅक्टरचा वापर करीत असत. छोटे शेतकरी बैलजोडीने शेतीची मशागत करीत असत. परंतु, गेल्या काही वर्षांमध्ये मोठे व छोटे शेतकरीदेखील ट्रॅक्टरलाच पसंती देताना दिसत आहेत. बैलाने मशागत करण्यासाठी बैलजोडी (औत) वेळेवर उपलब्ध होत नाही व ट्रॅक्टर लगेच उपलब्ध होतो व काम पण लवकर उरकते. नांगरणीसाठी ट्रॅक्टरला एका तासाला ४०० ते ५०० रुपये भाडे द्यावे लागते.
बैलजोडीने मशागत करावयाची असल्यास त्यांनाही जास्त पैसे द्यावे लागतात व बैलजोडीने एखादे शेत मशागत करण्यासाठी तीन ते चार तास लागतात. तेच काम ट्रॅक्टरने एक, दोन तासामध्ये उरकते. भातलावणीच्या वेळी शेतामध्ये नांगरणी (चिखल) करावा लागतो. पूर्वी बैलजोडीने हा चिखल केला जायचा. आता ट्रॅक्टरचा वापर करण्यात येत आहे. भातलावणीच्या वेळी ट्रॅक्टरला विशिष्ट प्रकारची लोखंडी चाके बसवून चिखल केला जातो. भातलावणी केली जाते. ट्रॅक्टरने कामदेखील पटकन होते.
बैलजोडीच्या वाढत्या किंमती त्यांना वर्षभर सांभाळणे देखील काहींना शक्य होत नसल्याने ट्रॅक्टरकडे शेतकऱ्यांचा कल वाढताना दिसत आहे. एकूणच शेतीच्या मशागतीसाठी ट्रॅक्टरचा वापर वाढला आहे. (वार्ताहर)

Web Title: Use of tractor instead of oxen increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.