इच्छुकांच्या कार्यक्रमात काळ्या पैशाचा वापर

By Admin | Updated: January 10, 2017 03:23 IST2017-01-10T03:23:30+5:302017-01-10T03:23:30+5:30

महापालिकेची निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून तयार ठेवलेला काळा पैसा नोटाबंदीच्या निर्णयानंतर इच्छुक उमेदवारांनी प्रभागातील महिला बचत गट

Use of black money in the program of aspirants | इच्छुकांच्या कार्यक्रमात काळ्या पैशाचा वापर

इच्छुकांच्या कार्यक्रमात काळ्या पैशाचा वापर

पिंपरी : महापालिकेची निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून तयार ठेवलेला काळा पैसा नोटाबंदीच्या निर्णयानंतर इच्छुक उमेदवारांनी प्रभागातील महिला बचत गट, मंडळाचे पदाधिकारी, सदस्य यांच्या नावे जवळच्या सहकारी बँकांमध्ये जमा केला. शेकडो बँक खाती नव्याने उघडली. त्या खात्यांतील रक्कम आता निवडणुकीच्या निमित्ताने आयोजित केल्या जाणाऱ्या कार्यक्रमांसाठी वापरली जात आहे.
बँका, एटीएममधून रक्कम काढण्यास मर्यादा असताना नगरसेवक, इच्छुक उमेदवारांना प्रभागातील कार्यक्रमांवर खर्च करण्यासाठी मोठ्या रकमा कोठून उपलब्ध होतात? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.
महापालिका निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यास काही दिवसांचा अवधी उरला आहे. आचारसंहिता लागू झाल्यांनतर प्रचारावर केलेल्या खर्चाचा हिशेब द्यावा लागणार आहे. त्यामुळे आचारसंहितेपूर्वीच इच्छुकांची कार्यक़्रमांच्या आयोजनावर मुक्तहस्ते उधळण सुरू आहे. कोणी प्रभागातील नागरिकांना देवदर्शन घडविण्यासाठी १० ते १५ बसगाड्या उपलब्ध करून देत आहे, तर कोणी महिलांसाठी कार्यक़्रमांचे आयोजन करून लोखोंची बक्षिसे वाटू लागले आहेत. अपेक्षित रक्कम काढता येइर््ल, अशी अद्यापही बँकांमध्ये परिस्थिती नाही. बँकांमध्ये खडखडाट आहे. पाचशे, हजाराच्या जुन्या नोटा चलनातून
बाद झाल्या आहेत. प्रत्येक व्यवहारासाठी नव्याच नोटा वापराव्या लागत आहेत.
नव्या नोटांची कमतरता जाणवत असताना, लाखोंचे नव्या नोटांचे बंडल वाहनांमधून घेऊन जाणाऱ्यांना पोलिसांना पकडले. त्यांची
चौकशी झाली; परंतु प्रभागांमध्ये सुरू असलेली फ्लेक्सबाजी, रोज होणारे कार्यक्रम यासाठी नव्या नोटा उपलब्ध कशा होतात? याचा शोध घेतल्यास नोटाबंदी वेळी दुसऱ्यांच्या नावे जमा केलेली रक्कमच
विविध कार्यक्रमांसाठी काढून आणली जात आहे.(प्रतिनिधी)

नोटाबंदीनंतर नवीन ४०० खाती
 पिंपरीतील दोन सहकारी बँकांत नोटाबंदीनंतर सुमारे ४०० खातेदारांनी खाती उघडली. काही इच्छुकांनी त्यांच्या नावे विशिष्ट रक्कम बँकेत जमा केली होती. रक्कम जमा करते वेळीच त्यांच्याकडून बँकेच्या स्लीपवर सह्या घेऊन ठेवल्या होत्या. त्याचा उपयोग करून घेतला जात आहे. तीन ते चार नव्या खातेदारांच्या नावावरील रक्कम एकाच वेळी काढल्यास कार्यक्रमासाठी ती खर्च करण्यास सहज उपलब्ध होत आहे. नोटाबंदीमुळे लपवलेला काळा पैसाच निवडणूक प्रचारात खर्चासाठी वापरला जात आहे. त्यामुळे इच्छुकांना कधीच नोटांची टंचाई भासत नसल्याचे दिसून येत आहे.

Web Title: Use of black money in the program of aspirants

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.