महाविद्यालयांचे संकेतस्थळ होणार अपडेट
By Admin | Updated: July 4, 2015 00:19 IST2015-07-04T00:19:49+5:302015-07-04T00:19:49+5:30
विद्यापीठ, महाविद्यालये व संस्थांच्या संकेतस्थळ यापुढे अपडेट राहणार आहेत. विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) याबाबत देशभरातील विद्यापीठांना सूचना दिल्या आहेत.
महाविद्यालयांचे संकेतस्थळ होणार अपडेट
पुणे : विद्यापीठ, महाविद्यालये व संस्थांच्या संकेतस्थळ यापुढे अपडेट राहणार आहेत. विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) याबाबत देशभरातील विद्यापीठांना सूचना दिल्या आहेत. विद्यापीठ तसेच महाविद्यालयांतील सुविधा, अभ्यासक्रम, संशोधन, शिष्यवृत्ती, रँकिंग, शिक्षक, प्लेसमेंट अशा परिपूर्ण माहिती संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्याचे यूजीसीने सांगितले आहे. महाविद्यालयात प्रवेश घेताना विद्यार्थ्यांना संकेतस्थळावर सर्व माहिती उपलब्ध व्हावी, यासाठी यूजीसीने हे पाऊल उचलले आहे.
विद्यापीठ तसेच महाविद्यालय स्तरावर प्रवेश घेताना विद्यार्थ्यांना पुरेशी माहिती उपलब्ध होत नाही. सध्या सर्वच विद्यापीठे, महाविद्यालये तसेच खासगी शैक्षणिक संस्थांचे संकेतस्थळ आहेत.
या संकेतस्थळावर तेथील अभ्यासक्रम, वसतिगृह, विविध उपक्रम यांची माहिती प्रामुख्याने दिसते. मात्र, इतर माहितीची बहुतेक महाविद्यालयांच्या संकेतस्थळावर वानवाच दिसते. विद्यार्थी कोणत्याही महाविद्यालयात प्रवेश घेताना संकेतस्थळावर त्या महाविद्यालयाची माहिती घेतात. मात्र, अपुऱ्या माहितीमुळे संभ्रम निर्माण होतो. तसेच महाविद्यालयातूनही अनेकदा पुरेशी माहिती मिळत नाही.
त्यामुळे ऐकीव माहितीच्या आधारे विद्यार्थ्यांना संंबंधित महाविद्यालयात प्रवेश घ्यावा लागतो. त्यातून नंतर अडचणी आल्याचे अनेक प्रकार समोर आले. याअनुषंगाने यूजीसीने सर्व विद्यापीठांना संकेतस्थळ अपडेट करण्याच्या सूचना दिल्या आहेत.(प्रतिनिधी)
विद्यार्थी व त्यांच्या पालकांना संस्थेशी संबंधित सर्व माहिती संकेतस्थळावर उपलब्ध करून द्यावी, असे यूजीसीने स्पष्ट केले आहे. त्यामध्ये चालू प्रवेशप्रक्रियेशी संबंधित सर्व माहिती, अभ्यासक्रमनिहाय प्रवेशक्षमता अपेक्षित आहे. तसेच अभ्यासक्रमनिहाय शुल्करचना, विषयनिहाय शिक्षकांची माहिती, विविध उपक्रमांचे वेळापत्रक, शैक्षणिक वेळापत्रक, विद्यार्थीकेंद्रित सुविधा, संस्थेत झालेले संशोधन, संस्थेतून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना मिळालेली प्लेसमेंट, विविध संस्थांकडून मिळालेल्या मान्यता, विद्यार्थ्यांच्या तक्रारींबाबत तयार करण्यात आलेली सुविधा, संस्थेत उपलब्ध असलेल्या शिष्यवृत्त्या, संस्थेला मिळालेले मानांकन अशी विविध माहिती संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यास सांगण्यात आले आहे. ही माहिती संकेतस्थळावर मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांनी प्रवेश घेताना होणारी फसवणूक टळणार आहे.