कात्रज ते नवले ब्रीज रस्त्याचे अशास्त्रीय बांधकाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 04:09 IST2021-01-14T04:09:47+5:302021-01-14T04:09:47+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : वारंवार अपघात होत असलेला कात्रज ते नवले ब्रीज हा रस्ताच अशास्त्रीय पद्धतीने बांधला गेला ...

Unscientific construction of Katraj to Navle bridge road | कात्रज ते नवले ब्रीज रस्त्याचे अशास्त्रीय बांधकाम

कात्रज ते नवले ब्रीज रस्त्याचे अशास्त्रीय बांधकाम

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : वारंवार अपघात होत असलेला कात्रज ते नवले ब्रीज हा रस्ताच अशास्त्रीय पद्धतीने बांधला गेला असल्याचा आरोप राज्य माल व प्रवासी वाहतूक संघाने केला आहे. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांना त्यांनी या संदर्भात निवेदन दिले आहे. रस्ता क्षेत्रातील तज्ज्ञांसमवेत या रस्त्याची पाहणी करण्याचे आवाहन केले आहे.

रस्त्याच्या उंचीचा साधारण विचार न करता हा रस्ता बांधला गेला. त्यामुळे त्याला असाधारण उतार आला आहे. जड वाहने या रस्त्यावरून भरधाव वेग घेतात. त्यावर नियंत्रण करता येत नाही व त्यातून जीवघेणे अपघात होतात. याबाबत नॅशनल हायवे सिक्युरिटी ऑफ इंडिया, राज्य रस्ते विकास महामंडळ व वाहतूक सुरक्षेशी संबधित अन्य अनेक संस्थांबरोबर बरेच वेळा पत्रव्यवहार केला. मात्र, त्याची साधी दखलही या संस्थांनी घेतली नसल्याची तक्रार महासंघाचे अध्यक्ष बाबा शिंदे यांनी गडकरी यांना पाठविलेल्या निवेदनात केली आहे.

शिंदे म्हणाले, सरकारी अनास्थेमुळे या रस्त्यावरच्या अपघातात विनाकारण अनेक जिवांचा बळी जात आहे. यावर उपाय म्हणून नवले पूल ते कात्रज नवीन बोगदा हा रस्ता साताऱ्याकडे जाणाऱ्या वाहनांकरिता वापरण्यात यावा. साताऱ्याकडून मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांकरता अतिवळण व अतिउतार नसलेला स्वतंत्र रस्ता बांधण्यात यावा. याला वेळ लागेल, खर्च होईल. मात्र, त्यातून कायमस्वरूपी उपाय होईल.

जगातील कोणत्याही मेट्रो शहरात दिवसा अवजड वाहनांना प्रवेश करण्यास सक्त मनाई असते. वाहनसंख्येचा विचार करता, आता पुण्यासाठीही हीच पद्धत वापरण्याची वेळ आली असल्याचे मत शिंदे यांनी व्यक्त केले. त्यासाठी शहरात प्रवेश करणाऱ्या वाहनांच्या चालकांना दिवसा विश्रांती घेता, म्हणून रस्त्याच्या सुरुवातीला विश्रांतीगृहे, वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून द्यावी, असेही गडकरी यांना पाठविलेल्या निवेदनात सुचविले असल्याची माहिती शिंदे यांनी दिली. राज्याच्या परिवहन विभागालाही त्यांनी या निवेदनाची प्रत पाठविली आहे. किमान गडकरी यांच्याकडून तरी याची दखल घेतली जावी, अशी अपेक्षा शिंदे यांनी व्यक्त केली.

Web Title: Unscientific construction of Katraj to Navle bridge road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.