सभागृह नेत्यांनी सादर केले निकृष्ट गणवेश
By Admin | Updated: January 14, 2016 03:58 IST2016-01-14T03:58:34+5:302016-01-14T03:58:34+5:30
महापालिका शिक्षण मंडळाच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या गणवेशाचा दर्जा खूपच निकृष्ट असल्याचे सांगून, ते गणवेशच सभागृह नेते बंडू केमसे यांनी स्थायी समितीच्या बैठकी

सभागृह नेत्यांनी सादर केले निकृष्ट गणवेश
पुणे : महापालिका शिक्षण मंडळाच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या गणवेशाचा दर्जा खूपच निकृष्ट असल्याचे सांगून, ते गणवेशच सभागृह नेते बंडू केमसे यांनी स्थायी समितीच्या बैठकीमध्ये आयुक्त कुणाल कुमार यांच्या समोर बुधवारी सादर केले. आयुक्तांनी या गणवेशाची तपासणी करून, त्याचा अहवाल सादर करण्याचे आदेश या वेळी दिले.
शिक्षण मंडळाच्या ३०० शाळांमधील ८० हजारपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना दर वर्षी मंडळाकडून गणवेश, स्वेटर, रेनकोट, शैक्षणिक साहित्य यांचे वाटप केले जाते. त्यापोटी महापालिका कोट्यवधी रुपयांचा खर्च करते. या साहित्याचा दर्जा प्रयोगशाळेमध्ये तपासून मगच विद्यार्थ्यांना दिले जात आहे; मात्र या साहित्याच्या दर्जामध्ये सुधारणा झाली नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
विद्यार्थ्यांना यंदा देण्यात आलेले गणवेश बंडू केमसे यांनी स्थायी समितीच्या बैठकीत कुणाल कुमार व इतर अधिकाऱ्यांना दाखविले. सहा महिन्यांत हे गणवेश फेकून देण्याची वेळ विद्यार्थ्यांवर आली असल्याचे केमसे यांनी निर्दशनास आणून दिले. विद्यार्थ्यांना देण्यात आलेले बूटही विसंगत मापांचे असल्याचे प्रात्याक्षिक त्यांनी दाखवून दिले. या वेळी स्थायी समितीच्या सदस्यांनी याप्रकारावर तीव्र शब्दांमध्ये टीका केली.
महापालिकेच्या मोटार विभागाने घंटागाडीसाठी काढलेली निविदाही विशिष्ट ठेकेदाराला डोळ्यांसमोर ठेवून काढण्यात आली आहे. त्यामुळे खात्याची निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी करण्याची मागणी केली. या विभागाचे प्रमुख किशोर पोळ यांची बदली करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली आहे.