मिळकतकराची दुबार नोंदणी रद्द करा
By Admin | Updated: June 13, 2014 05:00 IST2014-06-13T05:00:52+5:302014-06-13T05:00:52+5:30
शहरातील मोकळ्या जागांवर बांधकाम पूर्ण झाल्यानंतर आवश्यक असलेले भोगवटा पत्र घेतल्यानंतरही शहरातील अनेक मोकळ्या जागांवर मिळकतकर विभागाकडून रिकाम्या जागांवरही कर आकारला जात आहे

मिळकतकराची दुबार नोंदणी रद्द करा
पुणे : शहरातील मोकळ्या जागांवर बांधकाम पूर्ण झाल्यानंतर आवश्यक असलेले भोगवटा पत्र घेतल्यानंतरही शहरातील अनेक मोकळ्या जागांवर मिळकतकर विभागाकडून रिकाम्या जागांवरही कर आकारला जात आहे. प्रशासनाच्या या अनागोंदी कारभारामुळे या मिळकतकराची थकबाकी दिवसेंदिवस वाढल्याचे दिसत असून या दुबार नोंदी तत्काळ दुरुस्त करव्यात अशी मागणी नागरी हक्क संस्थेने केली आहे.
महापालिकेच्या जुन्या तसेच नवीन हद्दीतील मोकळ्या जागांवरही पालिकेकडून मिळकतकराची आकारणी केली जाते. मात्र, या जागांवर नंतर बांधकाम पूर्ण झाल्यानंतर त्याचा भोगवटापत्र पालिकेच्या वतीने दिले जाते. हे भोगवटापत्र दिल्यानंतर पालिकेच्या मिळकतकर नोंदी मधील मोकळ्या जागेची कर नोंदणी रद्द करणे आवश्यक आहे. मात्र, ही नोंदणी न करता, त्याच जागेवर असलेल्या नवीन बांधकामासाठी पालिकेकडून पुन्हा कर आकारणी सुरू केली जाते. त्यामुळे एकाच जागेसाठी मिळकतकराची दोन बिले निघतात. तर संबंधित मिळकतधारक एकच बिल भरतो. परिणामी दुसरीकडे एका बिलाच्या थकबाकीचे प्रमाण वाढत असून ही रक्कम कोट्यवधी रुपयांच्या घरात पोहचली आहे. त्यामुळे मोकळ्या जागेच्या नावावर लागलेला कर शुन्य करावा अशी मागणी सुधीर कुलकर्णी यांनी केली आहे.