विद्यापीठाचाच ‘आविष्कार’
By Admin | Updated: January 30, 2017 03:04 IST2017-01-30T03:04:41+5:302017-01-30T03:04:41+5:30
विद्यार्थी व शिक्षकांमध्ये संशोधनाची आवड निर्माण व्हावी, या उद्देशाने घेतल्या जाणाऱ्या आविष्कार स्पर्धेवर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थी व शिक्षकांनी नवव्यांदा

विद्यापीठाचाच ‘आविष्कार’
पुणे : विद्यार्थी व शिक्षकांमध्ये संशोधनाची आवड निर्माण व्हावी, या उद्देशाने घेतल्या जाणाऱ्या आविष्कार स्पर्धेवर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थी व शिक्षकांनी नवव्यांदा आपले नाव कोरले आहे. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात आयोजित ११ व्या ‘आविष्कार - २०१६’ स्पर्धेत पुणे विद्यापीठाने सर्वसाधारण विजेतेपद पटकावले आहे. रविवारी पारितोषिक वितरण समारंभात विद्यापीठाने ११ परितोषिके मिळवली.
नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात २७ ते २९ जानेवारी या कालावधीत आविष्कार स्पर्धेचे आयोजन करण्यात आले
होते. राज्यभरातील १९ विद्यापीठाच्या ५६२ विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभाग नोंदविला. या सर्व विद्यार्थ्यांमधून ४८ विद्यार्थ्यांना बक्षिसे मिळाली. त्यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने सर्वात जास्त ११ परितोषिके मिळवून स्पर्धेचे सर्वसाधारण विजेतेपद पटकावले, तर सर्वसाधारण उपविजेतेपद जळगाव विद्यापीठाला मिळाले असून मुंबई विद्यापीठ तिसऱ्या क्रमांकावर आहे.
रविवार नांदेड विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर, एनसीएलचे जैवरासायनिक
विज्ञान विभागाचे माजी उपसंचालक डॉ. अनिल लचके आदींच्या उपस्थितीत पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. विद्यापीठाचे बीसीयुडी डॉ. व्ही. बी. गायकवाड, स्पर्धेचे समन्वयक डॉ. रवींद्र जायभाये आदींनी स्पर्धेसाठी घेतलेल्या परिश्रमामुळे हे यश मिळाले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील पराग शिंदे यांना मानवशास्त्र, भाषा आणि ललितकला या विभागातील पदवीस्तरावरील पारितोषिक मिळाले, तसेच शिक्षक स्तरावरील प्रथम पारितोषिक सुरेश जुंगारी यांनी पटकावले.
औषध आणि फार्मसी या विभागातील पदवी स्तरावरील प्रथम पारितोषिक ऋतुजा जगतापला मिळाले. वाणिज्य, व्यवस्थापनशास्त्र आणि विधी या विभागातील शिक्षकस्तरावरील प्रथम पारितोषिक विशाल अमोलिक यांना, तर द्वितीय पारितोषिक देवयानी पाटील यांना मिळाले. विज्ञान विभागातील पोस्ट पदव्युत्तरस्तरावरील प्रथम पारितोषिक ऋचा देशपांडेला मिळाले. अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान या विभागातील पदवीस्तरावरील प्रथम पारितोषिक अनुज नहारने पटकावले, तर शिक्षकस्तरावरील द्वितीय पारितोषिक संदीपकुमार वानखेडे यांना मिळाले.
(प्रतिनिधी)