विद्यापीठाच्या परीक्षेची गाडी रुळावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:10 IST2021-04-25T04:10:37+5:302021-04-25T04:10:37+5:30

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे प्रथम सत्राच्या परीक्षा घेतल्या जात असून, गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा घेतल्या जाणाऱ्या परीक्षांमध्ये ...

University exam train on track | विद्यापीठाच्या परीक्षेची गाडी रुळावर

विद्यापीठाच्या परीक्षेची गाडी रुळावर

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे प्रथम सत्राच्या परीक्षा घेतल्या जात असून, गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा घेतल्या जाणाऱ्या परीक्षांमध्ये बऱ्याच सुधारणा झाल्याचे दिसून येत आहे. परीक्षेसंदर्भात प्राप्त होणाऱ्या तक्रारींची संख्यासुद्धा एक ते दीड टक्‍क्‍यांपर्यंत आली आहे. गेल्या आठवडाभरापासून दररोज एक लाखापेक्षा अधिक विद्यार्थी परीक्षा देत आहेत. त्यामुळे विद्यापीठाची परीक्षेची गाडी रुळावर आली असल्याचे बोलले जात आहे.

पुणे विद्यापीठातर्फे पुणे, अहमदनगर व नाशिक या तीन जिल्ह्यांमधील सुमारे साडेपाच लाख विद्यार्थ्यांची परीक्षा १० एप्रिलपासून घेतली जात आहे. परीक्षा सुरू होऊन पंधरा दिवस झाले असून आत्तापर्यंत एकूण ११ लाख विद्यार्थ्यांनी विद्यापीठाचे विविध विषयाचे ऑनलाइन पेपर सोडवले आहेत. सुरुवातीला तीन दिवस विद्यार्थ्यांना परीक्षा दिल्यानंतर ४८ तासांच्या आत निकाल मिळू शकला नाही. निकाल जाहीर केल्यानंतर एकाच दिवशी सुमारे साडेचार लाख विद्यार्थ्यांनी संकेतस्थळाला भेट दिल्याने सर्व्हर डाऊन झाला होता. त्यामुळे विद्यार्थ्यांना निकालास संदर्भातील तक्रारी नोंदविता आल्या नाहीत. परंतु विद्यापीठाने २५ एप्रिलपर्यंत तक्रार करण्यासाठी मुदतवाढ दिली. तसेच अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांना काही आकृत्या दिसू शकल्या नाहीत. या घटना वगळता विद्यापीठाची परीक्षा आत्तापर्यंत सुरळीतपणे सुरू आहे. मागील वर्षी परीक्षेदरम्यान मोठ्या प्रमाणावर अडचणी निर्माण झाल्या होत्या.

विद्यापीठातर्फे सध्या सुरू असलेल्या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे विद्यापीठाच्या एसपीपीयू एज्युटेक फाउंडेशन या कंपनीच्या माध्यमातून परीक्षा योग्य पद्धतीने घेणे शक्य झाले असल्याचे दिसून येत आहे. तीन जिल्ह्यांमधील सुमारे साडेपाच लाख विद्यार्थी सहा ते आठ विषयांची परीक्षा देणार आहेत. त्यामुळे तब्बल ३५ लाख विद्यार्थी विद्यापीठाची परीक्षा देणार आहेत, असे एकाअर्थी म्हणावे लागेल.

विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक महेश काकडे म्हणाले, विद्यापीठाने सुरुवातीपासूनच परीक्षा घेण्यासंदर्भात नियोजनबद्ध कार्यक्रम तयार केला. परीक्षा अर्ज स्वीकारण्यापासून प्राप्त अर्जांचा डेटा तयार होऊन हॉल तिकीट तयार होण्यापर्यंतची प्रक्रिया निश्चित कालावधीत पूर्ण करण्यात आली. तसेच यापूर्वी घेतलेल्या परीक्षांच्या अनुभवातून अनेक गोष्टी शिकण्यास मिळाल्या. त्यामुळे परीक्षेदरम्यान येणाऱ्या त्रुटी दूर करण्यात आल्या. ऐनवेळी विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्याचे टाळले. परीक्षा अर्ज भरताना काही विद्यार्थ्यांच्या चुका झाल्या आहेत. अशा सुमारे बाराशे ते तेराशे विद्यार्थ्यांची परीक्षा नंतर घेतली जाणार आहे. आत्तापर्यंत विद्यापीठाच्या सर्व परीक्षा सुरळीतपणे घेण्यात आल्या.

-------

विद्यापीठाची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची आकडेवारी

दिनांक - परीक्षार्थी - परीक्षा दिलेले विद्यार्थी

१५/४/२१ - ४३,०६८ - ३९,४८३

१६/४/२१ १,४२,५४० -१,३५,३६४

१७/४/२१ १,४१,३८४ १,३४,९१९

१८/४/२१ १,४५,६१४ १,३९,०९७

१९/४/२१ १,४७,८७६ १,४२,६८७

२०/४/२१ १,५८,६१९ १,५४,७८३

२२/४/२१ १,२६,६९८ १,२१,३०४

२३/४/२१ १,२४,३९१ १,१९,७६०

२४/४/२१ ८८,४६५ ८२,३९३

-----------------------------------------------

Web Title: University exam train on track

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.