विद्यापीठ परिसर वाहतुकीच्या चक्रव्यूहात
By Admin | Updated: April 14, 2017 04:37 IST2017-04-14T04:37:50+5:302017-04-14T04:37:50+5:30
सेनापती बापट रस्ता, पाषाण रस्त्यावर पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू असल्याने संपूर्ण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसरातील वाहतूक एक चक्रव्यूहात

विद्यापीठ परिसर वाहतुकीच्या चक्रव्यूहात
पुणे : सेनापती बापट रस्ता, पाषाण रस्त्यावर पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू असल्याने संपूर्ण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसरातील वाहतूक एक चक्रव्यूहात अडकली आहे़ पुणे शहर व पिंपरी-चिंचवड, हिंजवडी या परिसराला जोडणारा हा महत्त्वाचा रस्ता असल्याने या कामामुळे संपूर्ण परिसरात दररोज मोठी वाहतूककोंडी होत असून, परिसरातील नागरिक या प्रकारामुळे त्रस्त झाले आहेत़ हा त्रास जवळपास एक महिना सहन करावा लागणार आहे़
एसएनडीटीपासून पाषाण येथील पाण्याच्या टाकीला पाणीपुरवठा करण्यासाठी ही पाईपलाईन टाकली जात आहे़ सेनापती बापट रोडवरील मुथा चेंबरपर्यंतचे काम यापूर्वी पूर्ण करण्यात आले आहे़ आता तेथून पुढील पाईपलाईन टाकण्याचे काम २ एप्रिलपासून सुरू झाले़ पण, गेल्या १० दिवसांत काही मीटरचेच काम पूर्ण झाले आहे़ एका बाजूला या परिसरात मोठ्या प्रमाणावर होणारी वाहतूककोंडी त्याच वेळी हे काम अतिशय संथ गतीने सुरू असल्याने परिसरातील नागरिक संतप्त
झाले आहेत़
या कामामुळे सेनापती बापट रोडवरील हॉटेल जे डब्ल्यू मेरियटपासून पुढे जाण्यास केवळ दुचाकींना परवानगी देण्यात येत आहे़ मोटारी, टेम्पो, बस अशी सर्व जड वाहतूक तेथून उजवीकडे वळून ओम सुपर मार्केट चौक ते संगण्णा धोत्रे पथमार्गे विद्यापीठ उड्डाणपुलावरून बाणेर-औंधकडे वळविण्यात आली आहे.
वाहतुकीची कोंडी सोडविताना वाहतूक पोलिसांना मोठी कसरत करावी लागते. पाण्याची पाईपलाईन टाकणे हे काम महत्त्वाचे
असले, तरी त्यासाठी इतका मोठा कालावधी लागण्याची गरज काय, असा प्रश्न उपस्थित होऊ
लागला आहे़
हॉटेल मेरियटसमोरील चौकातील वाहतूक पोलिसांनी सांगितले, की आधीच या रस्त्यावर सकाळ-संध्याकाळी मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असते़ त्यात सेनापती बापट रोडवरील सर्व वाहतूक छोट्या रस्त्यांवर वळविल्याने ओम सुपर मार्केट व परिसरात दिवसरात्र वाहतूककोंडी होत आहे़
मोटारचालक रमेश पालवे म्हणाले, ‘‘त्रास सहन करण्याचा प्रश्न नाही. किती दिवस हे काम सुरू राहणार तसेच मुख्य रस्त्यावर असे काम सावकाश पद्धतीने का केले
जाते?’’ भरत रायकर म्हणाले, ‘‘पर्यायी रस्ता जरी दिला असला तरी तो पुरेसा आहे का? महत्त्वाचा पाणीपुरवठा विभागाशी निगडित असल्याने सामाजिक भान जागरूक होत सहकार्याची भूमिका तयार होते; पण पालिका, कंत्राटदार यांनी ही समस्या लवकर सोडवावी.’’
गणेशखिंड रस्त्यावर वाहतूक नियंत्रण करणाऱ्या पोलिसांनी सांगितले, की ही वाहतूककोंडी सोडविण्याासाठी भोसरी, पिंपरी-चिंचवड अशा अनेक ठिकाणांहून वाहतूक पोलीस मागविण्यात
आले आहेत.
कमीत कमी सेनापती बापट रस्त्याने दुचाकी वाहनांना प्रवेश दिल्यामुळे इथली गर्दी नियंत्रणात आणण्यास मदत होते; नाही तर मग अवघड झाले असते. अरुंद रस्त्यामुळे ही वाहतूक गर्दी दिवसभर आहे. (प्रतिनिधी)
पादचाऱ्यांना रस्ता ओलांडणेही झाले धोकादायक
सेनापती बापट रोड ते ओम सुपर मार्केट व तेथून गणेशखिंड रोडवर दिवसभर वाहनांची मोठी गर्दी होत आहे़ यामुळे येथे अगदी रस्ता ओलांडणेही अशक्य होऊन बसले आहे़ त्याच वेळी वारंवार होणाऱ्या वाहतूककोंडीमुळे वाहनचालकांकडून मोठ्या प्रमाणावर हॉर्न वाजवत असल्याने त्याचा त्रास परिसरातील नागरिकांना होऊ लागला आहे़
गणेशखिंड रोडवरून उड्डाणपुलावरून वाहने बाणेर व औंध रोडकडे वळविण्यात आली आहेत; पण वाहनांचा ओघ इतका वाढला आहे, की त्या ठिकाणीही गाड्यांच्या रांगा लागू लागल्या आहेत़ पाषाण रोडकडे जाणारी वाहतूक बाणेर रोडला वळविल्याने तेथून पुढे अभिमान श्रीकडे जाणाऱ्या चौकात वाहनांची मोठी गर्दी होऊ लागली आहे़ तेथे पादचाऱ्यांना रस्ता ओलांडणेही अवघड होऊन बसले आहे़
कंत्राटदाराचा हलगर्जीपणा; महावितरणची केबल तोडली
सेनापती बापट रोडवर पाण्याच्या पाईपलाईनचे काम करण्यासाठी खोदकाम करीत असताना गुरुवारी जेसीबीने महावितरणची केबल तोडली़ त्यामुळे शिवाजी हौसिंग सोसायटी परिसराचा सर्व वीजपुरवठा खंडित झाला़ महावितरणचे अधिकारी व कर्मचारी तातडीने तेथे गेले़ त्यांनी दुरुस्ती करून तासाभराने वीजपुरवठा सुरू केला़ या वेळी त्यांनी कंत्राटदाराला स्पष्ट सूचना दिल्या, की आमचा कर्मचारी उपस्थित असतानाच खोदकाम करावे़ यानंतर सर्व जण जेवणासाठी गेले़
जेवणानंतर परत येत असतानाच एका कामगाराने कुदळीने खणण्यास सुरुवात केली़ त्याने कुदळ मारली ते थेट महावितरणच्या केबलवरच़ कुदळीच्या घावामुळे केबल बर्स्ट झाली़ सुदैवाने या कामगाराला काही झाले नाही़
केबल बर्स्ट झाल्याने पुन्हा एकदा या परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला़ केबल जोडण्याचे काम सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होते़ या वेळी महावितरणच्या अधिकाऱ्यांनी ‘जर आमचा कर्मचारी उपस्थित नसताना तुम्ही खोदकाम केले आणि काही बरे वाईट झाले तर पोलीसाकडे तक्रार देऊ,’ असा इशारा दिला़
सेनापती बापट रोड व पाषाण रोडवरील काम ६०० मीटरचे आहे़ या भागातील दगड खूप टणक असल्याने कामाला वेळ लागत आहे़ एक वर्षांपासून आम्ही पाईपलाईन टाकण्यासाठी परवानगी मागत होतो़ तेव्हा परवानगी मिळाली असती, तर हे काम याअगोदरच पूर्ण झाले असते़ गेल्या आठ दिवसांत फारसे काम झाले नसले, तरी यापुढे जादा मशीनरी लावून काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न राहील़
- विजय कुलकर्णी,
मुख्य अभियंता, पाणीपुरवठा विभाग, पुणे महापालिका
या कामामुळे परिसरातील वाहतूक नियंत्रणासाठी ३५ कर्मचाऱ्यांचा ताफा लावावा लागला आहे़ शाळा बंद असल्याने २० टक्के वाहने कमी झाली आहेत़ अभिमान श्री चौकात होणारी कोंडी टाळण्यासाठी तेथील सिग्नल बंद केला आहे़ लोकांचा त्रास कमी व्हावा, म्हणून आमचा प्रयत्न आहे़ हे काम एक महिना चालेल़
- कमलाकर ताकवले,
वरिष्ठ पोलीस निरीक्षक,
वाहतूक विभाग