झुंबराच्या प्रकाशाने विद्यापीठाची इमारत उजळली

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2019 07:38 PM2019-08-20T19:38:39+5:302019-08-20T19:39:01+5:30

विद्यापीठाच्या इमारतीवर झालेल्या खर्चाची चर्चा इंग्लंडच्या राणीच्या दरबारात झाली होती.

The university building was illuminated with the lights | झुंबराच्या प्रकाशाने विद्यापीठाची इमारत उजळली

झुंबराच्या प्रकाशाने विद्यापीठाची इमारत उजळली

Next

पुणे: पुण्याचा ऐतिहासिक ठेवा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सावित्रीबाई फुले पुणेविद्यापीठाच्या भव्य इमारतीच्या दुरूस्तीचे काम पूर्ण झाले आहे. ब्रिटीश कालीन झुंबरांमुळे या इमारतीमधील विविध सभागृहांची शोभा अधिक वाढली असून आकर्षक रोषणाईने इमारत पुन्हा एकदा उजळून निघाली आहे.
विद्यापीठाच्या इमारतीवर झालेल्या खर्चाची चर्चा इंग्लंडच्या राणीच्या दरबारात झाली होती. इमारती उभारणीसाठी झालेले खर्च पाहून ब्रिटीश सरकारने या इमारतीचे बांधकाम करणाऱ्या अभियंत्याची बदली ऑस्ट्रेलिया येथे केली होती. त्या काळात एखाद्या अधिकाऱ्याची बदली ऑस्ट्रेलिया येथे करणे म्हणजे एक प्रकारे शिक्षाच मानले जात होते. त्यामुळे विद्यापीठाच्या इमारती मागे मोठा इतिहास आहे.त्याच प्रमाणे विद्यापीठाच्या इमारतीमध्ये असणाऱ्या  वस्तूंनाही खूप महत्त्व आहे. ब्रिटिशांनी इमारतीचे काम पूर्ण केल्यानंतर इंग्लंडमधील डेव्हीड विल्किनसन या कंपनीच्या भारतामधील कलकत्ता येथील एफ अँण्ड सी ऑशलर या शाखेतून झुंबर खरेदी केले होते. बेल्जियन ग्लासेसचा वापर करून हे झुंबर तयार करण्यात आले होते.सध्य स्थितीत या प्रकारचे झुंबर मिळणे दुर्मिळच आहे.
 सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या इख्य इमारतीच्या दुरूस्तीचे काम 10 ते 15 वर्ष सुरू होते.  विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ.नरेंद्र जाधव यांच्या कार्यकालात दुरूस्तीच्या कामाला सुरूवात झाली आणि माजी कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे यांच्या कार्यकालात काम पूर्ण झाले. दुरूस्तीच्या कामामुळे इमारतीमधील भव्य-दिव्य झुंबर व विविध पोस्टर्स सुरक्षित ठिकाणी काढून ठेवण्यात आले होते.दुरूस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर विद्यापीठाने झुंबर बसविण्यासाठी तज्ज्ञ कारागिरांचा शोध घेतला.त्यानंतर मुंबई येथील त्रिवेणी लाईटस्ला झुंबर बसविण्याचे काम देण्यात आले. हे काम पूर्ण झाले आहे.आता मुख्य इमारतीच्या सभागृहात बसविलेल्या झुंबरांच्या प्रकाशामुळे सभागृह उजळून निघाली आहेत.
विद्यापीठाच्या इमारतीमधील ज्ञानेश्वर सभागृहात 3, सरस्वती सभागृहात 8 आणि शिवाजी सभागृहात 3 अशी एकूण 14 झुंबरं पुन्हा एकदा बसविण्यात आल्यामुळे इमारतीची शोभा अधिक वाढली असल्याचे दिसून येत आहे. सध्याच्या बाजार भावाचा विचार केला तर या झुंबरांची किंमत एक ते दीड कोटी रूपर्यांपर्यंत जाऊ शकते,असे विद्यापीठाच्या अधिका-यांनी सांगितले.

Web Title: The university building was illuminated with the lights

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.