सर्वांगीण विकासासाठी एकता महत्त्वाची
By Admin | Updated: March 26, 2015 00:24 IST2015-03-26T00:24:46+5:302015-03-26T00:24:46+5:30
ईश्वर, अल्ला, येशू सारे एकच आहेत. सर्वांगीण विकासासाठी एकता सर्वांत महत्त्वाची आहे. कोणताही धर्म वाईट नाही

सर्वांगीण विकासासाठी एकता महत्त्वाची
पुणे : ईश्वर, अल्ला, येशू सारे एकच आहेत. सर्वांगीण विकासासाठी एकता सर्वांत महत्त्वाची आहे. कोणताही धर्म वाईट नाही. एकमेकांतील चांगल्या वाईटाची पारख करा, हिंसा ज्यामुळे होते त्या द्वेषाचा नाश करा, असा मौल्यवान संदेश सर्व धर्माच्या प्रमुखांनी दिला.
सर्व पंथ समादर मंच व सामाजिक समरसता मंचच्या वतीने बुधवारी सर्व धर्माच्या प्रमुखांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता. त्या वेळी ते बोलत होते. याप्रसंगी समादर मंचचे जालिंदर कांबळे, भारतीय मजदूर संघाचे प्रदेशाध्यक्ष प्रभाकर बाणासुरे, सरचिटणीस अण्णा धुमाळ, शीख धर्माचे ग्यानी गुरविंदर सिंग, रामकृष्ण मठचे आचार्य सुनील महाराज, इस्लाम धर्माचे अनिस चिश्ती, यहुदी धर्माचे डेव्हिड, जैन धर्माचे विरागभाई गुरूजी, बौद्ध धर्माचे दत्तोबा कांबळे उपस्थित होते.
(प्रतिनिधी)
या जगात कोणत्याही देशात धार्मिक सत्ता स्थापन होऊ शकत नाही. केवळ निधर्मी सत्ताच स्थापन होऊ शकेल. कारण ईश्वर, अल्ला, येशू सगळे एकच आहेत. सर्व धर्मग्रंथही हेच सांगतात. एकमेकांतील भिंती लहान करा. त्या वाढवल्यात, तर विहिरीत अडकून पडल्यासारखे एकटे पडाल. एकमेकांच्या धर्माचा खरा इतिहास वाचा आणि समाजासमोर आणा.- अनिस चिश्ती
या जगातील सर्व धर्म चांगलेच आहेत. कोणताही धर्म कमी दर्जाचा किंवा वाईट नाही. आणि वाईट वागायला शिकवत नाही. जो एकमेकांतील भेद विसरून सर्वांना आपलंसं करेल, तोच खरा ईश्वर जाणेल.- गुरविंदर सिंग
ज्याठिकाणी कोणताच धर्म नसेल अशा वैचारिक पातळीवर स्वत:ला न्या. तिथे पोहोचायचा एकता हाच केवळ मार्ग असेल. आपल्या साऱ्यांचे शरीर, रक्त सारखेच आहेत. फरक फक्त नाव, राहणीमान आणि विचारांचा आहे. त्यामुळे हा भेद केवळ वरवरचा आहे. विविध फुलांना एका माळेत माळताना जसा धागा एकच असतो त्याप्रमाणेच सर्व माणसांतही आहे. असा धर्म तयार करायचा प्रयत्न करू जो एकमेकांना तोडण्याऐवजी जोडायचे काम करेल.
- सुनील महाराज
या जगातील सर्वांत मोठी गोष्ट म्हणजे अहिंसा आहे. एकमेकांना आणि विचारांना समजून न घेतल्याने द्वेषाला जागा मिळते. आणि या द्वेषातूनच अहिंसेचा जन्म होतो. एकमेकांबद्दलचा द्वेष सोडून स्वबळावर, स्वत:वर विश्वास ठेवून मेहनतीने समाजासाठी काय करता येईल, याचा विचार करा. कारण मेहनतीचे फळ नेहमीच चांगले मिळते.
- विरागभाई गुरूजी