ताला-सुराचा अनोखा मिलाफ
By Admin | Updated: February 13, 2017 01:13 IST2017-02-13T01:13:58+5:302017-02-13T01:13:58+5:30
‘जय शिव, शिव शिव शंकर’ या कथक रचनेतून सादर झालेला नृत्याविष्कार, अरविंदकुमार आझाद यांनी तबलावादनातून घडवलेली तालसफर

ताला-सुराचा अनोखा मिलाफ
पुणे : ‘जय शिव, शिव शिव शंकर’ या कथक रचनेतून सादर झालेला नृत्याविष्कार, अरविंदकुमार आझाद यांनी तबलावादनातून घडवलेली तालसफर, डॉ. माधुरी जोशी यांची ‘मोहे छेडो ना नंदके सुनहू छेल मोहे’ या सुरेल बंदिशीची पेशकश, हार्मोनियम आणि तबल्याच्या एकल सादरीकरणातून पेश केलेला ताला-सुराचा अनोखा नजराणा अशा बहारदार नृत्याविष्कार व वाद्यांच्या सुरावटींत तालशिक्षक गोविंदराव जोशी (जोशीबुवा) यांना कलाकारांनी अनोखी आदरांजली वाहिली.
निमित्त होते नृत्यभारती कथक डान्स अॅकॅडमीच्या स्थापनेपासून सलग ४५ वर्षे सहवादक, संगीतकार आणि तालशिक्षक म्हणून साथ देणाऱ्या गोविंदराव जोशी यांच्या २५ व्या स्मृतीवर्षानिमित्त व नृत्यभारतीच्या ७० व्या वर्षानिमित्त नृत्यभारती परिवार आणि सुनीता पुरोहित प्रस्तुत ‘उजवी बाजू’ या कार्यक्रमाचे. कोथरूड येथील बालशिक्षण मंदिर सभागृहात झालेल्या याकार्यक्रमात जोशी यांनी संगीतबद्ध केलेल्या पदांवरील नृत्यरचना, गाणी व त्यांच्यावरील ध्वनिचित्रफीत सादर करण्यात आली.
कार्यक्रमात रोहिणी भाटे यांच्या ज्येष्ठ शिष्या शरदिनी गोळे, गायिका डॉ. माधुरी जोशी, अजय पराड, पं. अरविंदकुमार आझाद, ज्येष्ठ व्हायोलिनवादक रमाकांत परांजपे, सतारवादक अतुल केसकर, ज्येष्ठ तबलावादक पांडुरंग मुखडे, गायक श्रीपाद भावे, माणिक पंडितराव, अनुराधा कुबेर, सुनील अवचट, चैतन्य कुंटे, तालवाद्यवादक आमोद कुलकर्णी, छायाचित्रकार कौस्तुभ अत्रे, मिलिंद फडणीस, शीतल ओक आदी कलाकारांचा सन्मान या वेळी केला. (प्रतिनिधी)
नृत्याविष्काराला रसिकांची दाद
४कार्यक्रमाची सुुरुवात ‘विनायकम गुरुम् भानुम’ या गणेशवंदनेने झाली. त्यानंतर गोविंदराव जोशी यांनी संगीतबद्ध केलेले ‘मुकुटात मनोहर मोर पीसे’ हे कृष्णवर्णनपर पद सादर करण्यात आले. ज्येष्ठ संगीतकार अजय पराड यांनी हार्मोनियमवादनातून ‘गणेश कंस’ राग सादर करीत रसिकांची मने जिंकली. त्यांना किशोर कोरडे यांनी तबल्यावर साथ केली.
४डॉ. माधुरी जोशी यांनी तुकाराम महाराजांचा ‘श्री अनंता मधुसूदना, पद्मनाभ नारायणा’ हा अभंग सादर करत वातावरणात रंग भरला. त्यांना अभिजित
जायदे यांनी तबल्यावर साथ दिली. पं. अरविंदकुमार आझाद यांनी साडेपाच मात्रांचा ‘महात्मा’ हा नवीन ताल सादर करीत गुरु रोहिणी भाटे आणि गोविंदराव जोशी यांना श्रद्धांजली वाहिली. नृत्यभारतीच्या विद्यार्थिनींनी केलेल्या नृत्याविष्काराला उपस्थितांनी दाद दिली.