अनफिट स्कूलबस हटविणार
By Admin | Updated: October 30, 2016 02:53 IST2016-10-30T02:53:44+5:302016-10-30T02:53:44+5:30
फिटनेस प्रमाणपत्र घेण्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या शहरातील साडेचारशे स्कूलबसच्या विरोधात कडक कारवाई करण्याचा निर्णय प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) घेतला आहे

अनफिट स्कूलबस हटविणार
पुणे : फिटनेस प्रमाणपत्र घेण्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या शहरातील साडेचारशे स्कूलबसच्या विरोधात कडक कारवाई करण्याचा निर्णय प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) घेतला आहे. या बसचा परवाना रद्द करण्याची नोटीस काढण्यात आली असून, दिवाळीनंतर त्याची अंमलबजावणी करण्यात येईल.
शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनांना अपघात होण्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. त्यामुळे शालेय वाहनांच्या फिटनेसबाबत आरटीओने नियमांची कडक अंमलबजावणी सुरू केली आहे. चालू शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वीच स्कूलबस चालकांना फिटनेस सर्टिफिकेट घेण्याचे आवाहन केले होते. शाळा सुरू झाल्यावर विद्यार्थ्यांना आरटीओच्या कारवाईचा कोणताही त्रास होऊ नये, हा यामागाचा उद्देश होता. या संदर्भात उच्च न्यायालयाच्या खंडपीठानेदेखील तसे आदेश दिले होते. निम्मे शैक्षणिक वर्ष उलटल्यानंतरही अनेक बसचालकांनी फिटनेस सर्टिफिकेट घेतलेले नाही. त्यामुळे अशा बसचालकांचा परवाना रद्द करण्याची नोटीस काढण्यात आली आहे.
पुणे शहरात स्कूलबस अथवा व्हॅन अशी मिळून २८०० खासगी अथवा शाळेच्या मालकीची वाहने आहेत. यापैकी २३५० वाहनांनी फिटनेस सर्टिफिकेट घेतलेले आहे. अजूनही साडेचारशे वाहनचालकांनी त्यांचे वाहन फिटनेस चाचणीसाठी आरटीओ कार्यालयात आणले नाही. या वाहनचालकांना दिवाळीपर्यंत संधी देण्यात आली होती. मात्र, आता त्यांचा विद्यार्थी वाहतुकीचा परवाना रद्द करण्यात येणार आहे.
आरटीओने या वाहनचालकांना कारणे दाखवा नोटीसही बजावली होती. यामध्ये ३५० व्हॅन व शंभर बसचा समावेश होता. अनेक वेळा संधी देऊनही फिटनेस टेस्ट न केल्याने त्यांचा विद्यार्थी वाहतुकीचा परवाना रद्द करण्यात येईल. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत कोणतीही तडजोड करण्यात येणार नसल्याचे आरटीओच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.