अकरावी प्रवेशासाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविली जात असून, पुणे व पिंपरी चिंचवडमधील ११३ कनिष्ठ महाविद्यालयांतील १ लाख १३ हजार २०५ जागांसाठी प्रवेशाच्या तीन फे-या राबविण्यात आल्या आहेत, तसेच सध्या प्रवेशाची पहिली विशेष फेरी सुरू असून सुमारे ३ हजार विद्यार्थ्यांनीच या फेरीसाठी कनिष्ठ महाविद्यालयांचे पसंतीकम निवडले असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे अकरावी प्रवेशाच्या तब्बल ५० हजार जागा रिक्त राहू शकतात.
प्रवेशाच्या तीन फेऱ्यानंतर अकरावी प्रवेशाच्या तब्बल ७० हजार जागा रिक्त आहेत. अकरावीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या घटल्यामुळे विनाअनुदानित कनिष्ठ महाविद्यलयांतील तुकड्या आपोआप कमी होणार आहेत. परिणामी कोरोनामुळे सध्या लहान-मोठ्या कनिष्ठ महाविद्यालयांत तुटपुंजा पगारावर काम करणाऱ्या शिक्षकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळण्याची शक्यता आहे.
-----------------
गेल्या दहा वर्षांत राज्य शासनाने स्वीकारलेले शिक्षणविषयक धोरण आणि कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा फटका एकूण शिक्षण क्षेत्राला बसला आहे. त्यामुळे यंदा अकरावीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत घट झाल्याने त्याचा फटका विनाअनुदानित तुकड्यांना बसणार आहे. त्यामुळे शिक्षकांच्या नोकरीला धोका निर्माण झाला आहे.
- एन. के. जरग, माजी संचालक, माध्यमिक शिक्षण, महाराष्ट्र राज्य.
-------------------
शासनाने स्वीकारलेल्या धोरणामुळे विनाअनुदानित कनिष्ठ महाविद्यालयांतील शिक्षकांवर उपासमारीची वेळ आली आहे. कोरोनाकाळात काही शिक्षकांनी शेतीत, हॉटेलमध्ये, पेट्रोलपंपावर काम केले. सुमारे दहा वर्षांपासून काम करणाऱ्या शिक्षकांबाबत शासनाने गांभीर्याने विचार करण्याची आवश्यकता आहे.
- संतोष फासगे, सरचिटणीस, कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटना, महाराष्ट्र राज्य
------------------------