जनसेवा पॅनलचा निर्विवाद विजय
By Admin | Updated: May 23, 2015 23:20 IST2015-05-23T23:20:05+5:302015-05-23T23:20:05+5:30
आमदार राहुल कुल यांच्या नेतृत्वाखाली जनसेवा पॅनलने सर्व जागांवर विजय मिळवत साखर कारखान्यांवर पुन्हा एकदा वर्चस्व मिळविण्यात यश संपादन केले आहे़

जनसेवा पॅनलचा निर्विवाद विजय
दौंड : भीमा पाटस सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत आमदार राहुल कुल यांच्या नेतृत्वाखाली जनसेवा पॅनलने सर्व जागांवर विजय मिळवत साखर कारखान्यांवर पुन्हा एकदा वर्चस्व मिळविण्यात यश संपादन केले आहे़ माजी आमदार रमेश थोरात यांच्या नेतृत्वाखालील भीमा बचाव सहकार पॅनलचा निवडणुकीत धुव्वा उडाला असून त्यांना एकही जागा जिंकता आली नाही़
जनसेवा पॅनल अडीच ते तीन हजार मतांच्या फरकाने विजयी झाले आहे. आज सकाळी ८ वाजता सोनवडी येथील धान्य गोडाऊनमध्ये मतमोजणीला सुरुवात झाली. साधारणत: राखीव गटातील ५ उमेदवारांचा निकाल पावणे चारच्या सुमारास जाहीर झाला. त्याचवेळी विजय कोणाच्या पारड्यात पडणार, हे स्पष्ट झाले होते़ त्यामुळे मतमोजणी केंद्राच्या बाहेर कार्यकर्त्यांचा शुकशुकाट होता. त्यानंतर इतर गटातील मतमोजणीला सुरुवात झाली़ रात्री ८ वाजण्याच्या सुमारास सर्व निकाल हाती आले. निवडणूक निर्णय अधिकारी समीर शिंगटे, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी उत्तम दिघे, निवडणूकविभागाचे नायब तहसीलदार उत्तम बडे, नायब तहसीलदार सुनील शेळके यांच्यासह त्यांच्या महसूल विभागाच्या सहकाऱ्यांनी मतमोजणीसाठी योग्य ते नियोजन केल्यामुळे वेळीच मतमोजणी झाली. तसेच कायदा आणि सुव्यवस्थेसाठी दौंडचे उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र मोरे, दौंडचे पोलीस निरीक्षक सजन हंकारे, यवतचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय गोरड यांच्यासह पोलीसांचे सहकार्य मिळाले. दरम्यान, जनसेवा पॅनलचे प्रमुख तथा आमदार राहुल कुल सायंकाळी साडे सहाच्या सुमारास मतमोजणी केंद्रात आल्यानंतर कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.
(संबंधीत वृत्त पान ८ वर)
विजय अपेक्षित होता
भीमा पाटसच्या निवडणुकीतील आमचा विजय अपेक्षित होता. विरोधकांनी टीकेची झोड उठवली़ विरोधकांचे आरोप राजकीय होते. मात्र, मतदारांनी टीकेचे उत्तर मतपेटीतून दिले. कारखाना अडचणीत असतांना प्रतिकुल परिस्थितीत निवडणूक लढविली. मात्र, या विजयाने नैतिक जबाबदारी वाढली आहे. त्यामुळे कारखाना अडचणीतून बाहेर काढणे हा एकमेव उद्देश डोळ्यांसमोर राहील. भीमा-पाटसची सत्ता १४ वर्षांपूर्वी हाती घेतली तेव्हा कारखान्यावर देखील कर्ज होते. वास्तविक पाहता कारखान्याच्या हितासाठी ही निवडणूक बिनविरोध व्हायला पाहिजे होती.
- राहुल कुल, आमदार
मतदारांनी चांगला निर्णय घेतला
भीमा पाटसच्या मतदारांनी दिलेला कौल मान्य असून मतदारांनी या निवडणुकीत जो निर्णय घेतला तो चांगलाच निर्णय घेतला, असे म्हणावे लागेल. शेतकऱ्यांच्या ऊसाला भाव नाही, कामगारांना वेळेवर पगार नाही. तर सभासदांच्या हक्काची साखर दिवाळीपासून बंद आहे. भीमा पाटसच्या सत्ताधाऱ्यांकडे पुन्हा सत्ता गेली, परिणामी कारखान्याचे बरं वाईट काय व्हायचे ते त्यांच्याच हातून होईल, यात शंका नाही. तेव्हा आमच्या दृष्टीने भीमा पाटस कारखान्याची निवडणूक अवघड विषय होता. तरी त्यातल्या त्यात ४ दिवसांत जी काही मेहनत घेता आली. ती मेहनत घेऊन निवडणुकीला सामोरे गेलो.
- रमेश थोरात, माजी आमदार