घर समजून शेजारी घुसखोरी
By Admin | Updated: November 16, 2016 02:29 IST2016-11-16T02:29:53+5:302016-11-16T02:29:53+5:30
दारूची नशा कोणाला काय करायला लावेल, हे सांगता येत नाही़ नशेमध्ये कोण कोणाच्या घरात जाते आणि काय काय गोंधळ घातला जातो

घर समजून शेजारी घुसखोरी
पुणे : दारूची नशा कोणाला काय करायला लावेल, हे सांगता येत नाही़ नशेमध्ये कोण कोणाच्या घरात जाते आणि काय काय गोंधळ घातला जातो, याविषयी अनेक चित्रपटांमधून वेगवेगळे किस्से आपण पाहिले असतील. पण, नशेत तुम्ही स्वत:चे घर म्हणून जर दुसऱ्याच ठिकाणी घुसखोरी केली तर, काय होऊ शकते, याचा अनुभव एकाला मिळाला़
दारूच्या नशेत अॅड. नाना क्षीरसागर यांच्या कार्यालयात घुसखोरी करणाऱ्यास नागरिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी चोर समजून त्याला पोलिसी खाक्या दाखवल्याने मात्र त्याची पुरती नशा उतरली. ही घटना रविवारी रात्री गुरुवार पेठेत घडली.
गजाननसिंह हरिसिंग ठाकूर (वय २८, रा.गुरुवार पेठ) असे त्याचे नाव आहे. याप्रकरणी महेश श्रीगोंदेकर (वय ५०, रा.गुरुवार पेठ) यांनी फिर्याद दिली आहे.
अॅड. नाना क्षीरसागर यांचे गुरुवार पेठेमध्ये कार्यालय आहे. हे कार्यालय बंद असताना रविवारी रात्री साडेबाराच्या सुमारास आरोपीने मुख्य दरवाजास धक्का मारून आत प्रवेश केला.
स्वत:ची नेहमीची झोपायची जागा असल्याचे समजून त्याने तेथेच ताणून दिली. क्षीरसागर यांच्या कार्यालयाचा दरवाजा उघडा दिसल्याने आजूबाजूच्या रहिवाशांनी आत डोकावून पाहिले. तेव्हा आरोपी तेथे दारूच्या नशेत पडलेला आढळला़ तो चोर असल्याचे समजून नागरिकांनी त्याला खडक पोलिसांच्या ताब्यात दिले.
पोलिसांनी त्याला खाक्या दाखवताच त्याची पुरती उतरली. तो नाना क्षीरसागर यांच्या कार्यालया शेजारी असलेल्या भोजनालयात काम करतो. रात्री झोपायलाही तो भोजनालयातच असतो. याप्रकरणी पोलीस हवालदार शिवरकर तपास करीत आहेत.(प्रतिनिधी)