दुचाकी चोरीप्रकरणी अल्पवयीन ताब्यात
By Admin | Updated: January 14, 2017 03:18 IST2017-01-14T03:18:34+5:302017-01-14T03:18:34+5:30
बारामती शहर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने दुचाकी चोरीप्रकरणी अल्पवयीन युवकास ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून

दुचाकी चोरीप्रकरणी अल्पवयीन ताब्यात
बारामती : बारामती शहर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने दुचाकी चोरीप्रकरणी अल्पवयीन युवकास ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून २ लाख ७४ हजार रुपये किमतीच्या ११ दुचाकी हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.
बारामती शहरात दुचाकी चोरीचे प्रमाण वाढले आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक सुवेझ हक यांनी पोलीस गस्त वाढविण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार शहर पोलिसांच्या शोध पथकाची गस्त सुरु होती. ११ जानेवारीला गस्त सुरु असताना दुपारी ४च्या सुमारास शहरातील गुणवडी चौक येथे ग्लॅमर दुचाकीवर एक संशयित पोलिसांना आढळला. त्याला पोलिसांनी थांबवून विचारपूस केली. मात्र, त्याने समाधानकारक उत्तरे दिली नाहीत. त्याला अधिक चौकशीसाठी शहर पोलीस ठाण्यात आणण्यात आले.
हा संशयित अल्पवयीन युवक आहे. त्याने त्याच्याकडे असलेली दुचाकी शहरातील पाटस रस्ता येथून चोरल्याची कबुली दिली.
अल्पवयीन युवकाने त्याचा साथीदार लखण ऊर्फ डड्या नरसिंह भोसले (रा. तांबा, राजोरी,जि. बीड) याच्यासह बारामती, दौंड येथून ११ दुचाकी चोरल्याची क बुली दिली. २ लाख ७४ हजार रुपये किमतीच्या ११ दुचाकी पोलिसांनी त्याच्याकडून हस्तगत केल्या आहेत.
ही कारवाई अप्पर पोलीस अधीक्षक तानाजी चिखले, उपविभागीय पोलीस अधिकारी बापू बांगर, पोलीस निरीक्षक विजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकातील सुनील गायकवाड, पोलीस हवालदार अनिल काळे, पोलीस नाईक रमेश केकाण, रुपेश साळुंके, राजेंद्र गायकवाड, ओंकार सिताप, पोपट नाळे, सिद्धेश पाटील, नाथसाहेब जगताप, दादा डोईफोडे यांनी केली.
(प्रतिनिधी)