पुणे - यष्टिरक्षक फलंदाज शिवाली शिंदेचे शानदार अर्धशतक तसेच कर्णधार देविका वैद्य आणि तेजल हसबनीस यांनी केलेल्या जबरदस्त अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर २३ वर्षांखालील महिलांच्या एकदिवसीय क्रिके ट लीगमध्ये महाराष्ट्राने मंगळवारी हैदराबादचा ६१ धावांनी धुव्वा उडविला. या स्पर्धेतील महाराष्ट्राचा हा सलग दुसरा विजय ठरला.बीसीसीआयतर्फे आयोजित या स्पर्धेतील ही लढत नागपूर (जामठा) येथील व्हीसीए क्रिकेट स्टेडियमवर झाली. महाराष्ट्राच्या फलंदाज, गोलंदाज तसेच क्षेत्ररक्षकांनी प्रभावी कामगिरी करीत हैदराबाद संघावर निर्विवाद वर्चस्व गाजविले. शिवालीच्या ५२, तेजलच्यानाबाद ४७ तसेच देविकाच्या ३६ धावांच्या जोरावर महाराष्ट्राने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकांत ७ बाद २१९ धावा केल्या. सलामीवीर चार्मी गवई हिने ३१ तर सायली लोणकर हिने २४ धावांचे उपयोगी योगदान दिले. प्रत्युत्तरात, देविका (१७ धावांत ४ बळी) आणि तेजल (३४ धावांत ३ बळी) या जोडीने हैदराबादला ४९ षटकांत १५८ धावांवर गुंडाळले. महाराष्ट्राच्या क्षेत्ररकांनी लक्षणीय कामगिरी करताना हैदराबादच्या तिघींना धावबाद केले. या विजयासह महाराष्ट्राने ४ गुणांची कमाई केली.प्रथम फलंदाजी करणाऱ्या महाराष्ट्राचा प्रारंभ वाईट झाला. सलामीवीर प्रियांका घोडके हिला भोपळाही फोडता आला नाही. त्यानंतर सलामीवीर चार्मी आणि शिवाली यांनी दुसऱ्या विकेटसाठी ७३ धावांची भागीदारी करीत महाराष्ट्राला सावरले. देविका-तेजल जोडीने चौथ्या विकेटसाठी ३७ तर, तेजल-सायली जोडीने पाचव्या विकेटसाठी ४४ धावांची भागीदारी केल्याने महाराष्ट्राला दोनशेपार धावसंख्या उभारता आली. हैदराबादतर्फे कीर्ती रेड्डीने सर्वाधिक ४ बळी घेतले.विजयासाठी २२० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादने २ फलंदाज २६ धावांत गमावले. सलामीवीर जी. त्रिशा (४७) आणि कीर्ती रेड्डी (२८) यांनी तिसºया विकेटसाठी ७० धावांची भागीदारी केली. मात्र यासाठी त्यांनी २०.२ षटके खर्ची घातली. तेजलने एकाच षटकात या दोघींना बाद करीत हैदराबादवरील दबाव वाढविला. त्यानंतर लक्ष्मी प्रसन्नाचा (नाबाद ३२) अपवाद वगळता प्रतिस्पर्धी संघाची एकही फलंदाज मैदानावर टिकू शकली नाही. या संघाच्या ४ फलंदाज शून्यावर बाद झाल्या.संक्षिप्त धावफलक :महाराष्ट्र : ५० षटकांत ७ बाद २१९ (शिवाली शिंदे ५९, तेजल हसबनीस नाबाद ४७, देविका वैद्य ३६, चार्मी गवई ३१, सायली लोणकर २४, कीर्ती रेड्डी ४/३८, सी. श्रावणी भोगी १/१३, ई. चित्रा माहेश्वरी १/२१) वि. वि. हैदराबाद : ४९ षटकांत सर्व बाद १५८ (जी. त्रिशा ४७, लक्ष्मी प्रसन्ना नाबाद ३२, कीर्ती रेड्डी २८, देविका वैद्य ४/१७, तेजल हसबनीस ३/३४).
२३ वर्षांखालील महिला क्रिकेट : महाराष्ट्राकडून हैदराबादचा ६१ धावांनी धुव्वा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2019 02:08 IST