बेवारस वाहने पालिका करणार जप्त
By Admin | Updated: October 25, 2015 03:42 IST2015-10-25T03:42:07+5:302015-10-25T03:42:07+5:30
शहरातील गल्लीबोळ आणि प्रमुख रस्त्यावर वर्षानुवर्षे पडून असलेली चारचाकी आणि दुचाकी वाहने जप्त करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. येत्या सोमवारपासून

बेवारस वाहने पालिका करणार जप्त
पुणे : शहरातील गल्लीबोळ आणि प्रमुख रस्त्यावर वर्षानुवर्षे पडून असलेली चारचाकी आणि दुचाकी वाहने जप्त करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. येत्या सोमवारपासून ही मोहीम हाती घेण्यात येणार असून पहिल्या टप्प्यात या वाहनांच्या मालकांना सात दिवसात संबधित वाहन हालविण्याची नोटिस बजाविण्यात येणार आहे. त्यानंतरही वाहन रस्त्यावरून न हटविल्यास ते जप्त करण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेचे अतिक्रमण विभाग प्रमुख माधव जगताप यांनी दिली.
शहराच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने
तसेच या वाहनांमुळे रस्त्यावर होत असलेल्या वाहतूक कोंडीमुळे ही वाहने काढण्याची मागणी वाहतूक पोलीस तसेच प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून महापालिकेकडे करण्यात आली होती. त्यानुसार, सुरक्षिततेच्या दृष्टीने ही कारवाई करण्यात येणार असल्याचे जगताप यांनी स्पष्ट केले.
शहरात १५ वर्षांहून अधिक जुन्या झालेल्या तब्बल एक लाखाहून अधिक दुचाकी आणि चारचाकी वाहने आहेत. नियमानुसार, संबधित वाहन मालकांनी ही वाहने स्क्रॅप करणे आवश्यक आहे.
हजारो वाहन मालक ही
वाहने स्क्रॅप करत नाही. ती स्क्रॅप करण्यासाठी आवश्यक असलेली कागदपत्रे नसल्याने हे मालक ही वाहने घराबाहेर अथवा रस्त्यावरच लावतात. ही वाहने गेली अनेक वर्षे
रस्त्याच्या कडेला पडून असल्याने ती वाहतुकीसाठी अडथळे ठरत आहेत. त्यातच या वाहनांमुळे
दहशतवादी कारवायांसाठी वापर होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने वाहतूक पोलिसांनीही महापालिकेस पत्र पाठवून या वाहनांवर कारवाईची मागणी केली आहे. त्यानुसार, येत्या सोमवारपासून ही कारवाई सुरू करण्यात येणार असल्याचे जगताप यांनी स्पष्ट केले.
गाड्या जप्त करणार
येत्या सोमवारपासून रस्त्यावरील या गाड्यांचे सर्वेक्षण महापालिकेकडून सुरू करण्यात येणार आहे. त्यानुसार, ज्या बेवारस गाड्या असतील त्या जप्त केल्या जातील तर त्याच परिसरात मालक राहत असल्यास त्यांना सात दिवसांच्या आत ही वाहने रस्त्यावरून हलविण्याची ताकीद देण्यात येईल. त्यानंतरही वाहने न उचल्यास ती महापालिकेकडून जप्त करण्यात येणार आहेत. त्यानंतर मालक संबधित वाहन घेण्यासाठी आल्यास त्यांच्याकडून कारवाईचा खर्च तसेच दंड वसूल केला जाणार असल्याचे जगताप यांनी स्पष्ट केले.