हेल्पलाइन क्रमांकांपासून सामान्य अनभिज्ञ

By Admin | Updated: October 28, 2015 23:52 IST2015-10-28T23:52:51+5:302015-10-28T23:52:51+5:30

सामान्य नागरिकांसाठी शासनाने विविध विभागांचे टोल फ्री (हेल्पलाइन) क्रमांक सुरू केले आहेत. बहुतांशी क्रमांक सुरूदेखील आहेत.

Unaware of helpline numbers | हेल्पलाइन क्रमांकांपासून सामान्य अनभिज्ञ

हेल्पलाइन क्रमांकांपासून सामान्य अनभिज्ञ

शिरूर : सामान्य नागरिकांसाठी शासनाने विविध विभागांचे टोल फ्री (हेल्पलाइन) क्रमांक सुरू केले आहेत. बहुतांशी क्रमांक सुरूदेखील आहेत. मात्र, ज्यांच्यासाठी हे क्रमांक सुरू केलेत, ते या क्रमांकांपासून अनभिज्ञ असल्याने त्याचा त्यांना फायदा होत नसल्याचे चित्र आहे. वास्तविक या हेल्पलाइनमुळे सामान्यांना नक्कीच आधार मिळू शकेल, असे ‘लोकमत’ने या क्रमांकाशी संपर्क साधल्यावर लक्षात आले.
सामान्य नागरिकांना विविध प्रकारची मदतही तत्काळ अथवा वेळेत उपलब्ध व्हावी, या हेतूने शासनाने पोलीस विभागापासून ते आधार कार्ड विभागापर्यंत अशी २५ विभागांची हेल्पलाइन सुरू केली आहे. अलीकडे १०२/१०८ ही हेल्पलाइन रुग्णवाहिकेसाठी सुरू करण्यात आली आहे. या हेल्पलाइनचा शहरी भागात चांगला उपयोगही सुरू झाला आहे. मात्र, या क्रमांकाबाबत ग्रामीण भागात जास्त माहिती नसल्याचे दिसून आले. जिथे पर्याय उपलब्ध नाही, अशा ग्रामीण भागात याची जास्तीत जास्त लोकांपर्यंत माहिती पोचल्यास त्याचा चांगला फायदा होऊ शकेल. एका शासकीय कर्मचाऱ्यास रुग्णवाहिकेचा टोल फ्री क्रमांक किती? असे विचारले असता त्यांनी माहीत नाही, असे उत्तर दिले. शासकीय कर्मचाऱ्यांची ही अवस्था आहे, तर इतरांची काय? असा प्रश्न आहे.
अनेकदा एखाद्या गावाला जाण्यासाठी एसटी बस कोणत्या वेळेत, किती वेळा याची, तसेच इतरही एसटीविषयक माहिती आपल्याला हवी असते. यासाठी शासनाने १८००२२१२५० हा हेल्पलाइन क्रमांक दिला आहे. या क्रमांकावर ही माहिती उपलब्ध होते. मात्र, याबाबतही बहुतांशी नागरिक अनभिज्ञ आहेत. देशात, राज्यात घडणाऱ्या बलात्कार, छेडछाड या प्रकरणांमुळे महिला सुरक्षेसाठी शासनाने ‘महिला तक्रार’ म्हणून ‘१०९१’ हा क्रमांक (हेल्पलाइन) सुरू केला आहे. महिलांनी कोठूनही यावर संपर्क साधल्यास त्यांना पोलिसांची मदत मिळू शकते. कौटुुंबिक हिंसाचार, छळ प्रकरणांत महिलांना पोलीस ठाण्यात जाण्याआधी या हेल्पलाइनचा आधार मिळू शकतो. मात्र, बहुतांशी महिलांना या हेल्पलाइनची माहिती नसल्याचे वास्तव आहे.
बालगुन्हेगारी, बालकांवरील लैंगिक अत्याचार आदींसाठी १०९८ क्रमांकाची ‘चाइल्डलाइन’ ही हेल्पलाइन आहे. गर्भलिंगनिदान करून अवैध गर्भपात करण्याचा प्रकार (स्त्रीभ्रूणहत्या) कुठे आढळल्यास याबाबत काही मदत हवी असल्यास अथवा तक्रार करायची असल्यास १८००२३३४४७५ या हेल्पलाइनचा उपयोग होतो. या क्रमांकांची सामान्य नागरिकांनाच माहिती नसल्याने शासनाचा मूळ हेतू असफल झाल्यासारखा वाटतो. सामान्य नागरिकांना याची माहिती झाल्यास त्या हेल्पलाइनचा फायदा करून घेऊ शकतील.(वार्ताहर)

Web Title: Unaware of helpline numbers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.