अनधिकृत उत्खनन पाडले बंद
By Admin | Updated: March 4, 2015 22:40 IST2015-03-04T22:40:18+5:302015-03-04T22:40:18+5:30
कोणत्याच परवानग्या ग्रामपंचायतीस सादर न केल्याने सणसवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंचांनी अनधिकृत उत्खनन व बांधकाम बंद पाडले.

अनधिकृत उत्खनन पाडले बंद
कोरेगाव भीमा : सणसवाडी (ता. शिरूर) येथील हर्ष ओगल कंपोन्स प्रा. लि. बांधकामासाठी जमीन सपाटीकरणासाठी गौण खनीज उत्खननासाठी महसूल विभागाच्या संगनमताने परवानगीपेक्षा जास्त उत्खनन केल्याने व कारखाना उभारणीच्या कोणत्याच परवानग्या ग्रामपंचायतीस सादर न केल्याने सणसवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंचांनी अनधिकृत उत्खनन व बांधकाम बंद पाडले.
सणसवाडी येथे गट नं. ८९८/३ , ४ मध्ये हर्ष ओगल कंपोन्स या कारखान्याचे बांधकाम चालू असून, या बांधकामाच्या सपाटीकरणासाठी मोठ्या प्रमाणावर उत्खनन करण्यात आले असल्याचे ग्रामपंचायतीच्या निदर्शनास आले आहे.
या संदर्भात ग्रामपंचायतीचे सरपंच नवनाथ हरगुडे, तलाठी एस. के. शेख, ग्रामविकास अधिकारी जी. एस. शेलार यांनी याठिकाणी जाऊन काम बंद पाडले.
या वेळी याठिकाणी देखरेख करणाऱ्या चौधरी यांच्याकडे कारखान्याकडील उत्खननासाठीचे तहसीलदारांच्या परवान्याची चौकशी केली असता, आज रोजी १२०० ब्रास उत्खननाचे परवाना मिळाले. परंतु याठिकाणी २३ सप्टेंबर २०१४ रोजी कामगार तलाठी अश्विनी कोकाटे यांनी केलेल्या या वेळी ३५२८ ब्रास उत्खनन केल्याचे निष्पन्न झाले असल्याने सर्व ३५२८ ब्रास उत्खनानाचा संयुक्त पंचनामा त्या वेळीही करण्यात आला होता.
एवढे होऊनही पुन्हा पाच महिन्यांनंतरही बेकायदेशीर उत्खनन सुरू असल्याने पाच महिन्यांनंतरही उत्खनन चालू असल्याने १२०० ब्रासच्या परवान्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त उत्खनन केले असल्याने या कारखान्यावर गौन खनिज विभाग कोणती कारवाई करीत नसल्याने महसूल विभागाच्या कारभारावर शंका उपस्थित करण्यात येत आहे.
याबाबत कंपनीशी संपर्क केला असता, कुठलीच प्रतिक्रिया देण्यास नकार असल्याचे सांगण्यात आले. (वार्ताहर)
४या जागेवरील बांधकामाच्या शासकीय परवान्यांची मागणी ग्रामपंचायतीने वारंवार कारखान्याकडे केली़ परंतु, तरीही ते उपलब्ध झाले नसल्याची तक्रार सरपंच नवनाथ हरगुडे यांनी तहसीलदार रघुनाथ पोटे यांच्याकडे केली. तसेच, हीच तक्रार घेऊन सोमवारी महसूल विभाग व स्थानिक ग्रामपंचायत यांचा संयुक्त पंचनामा करून ग्रामपंचायतीकडून चालू कामाला नोटीस देऊन बंद केल्याची माहितीही सरपंच नवनाथ हरगुडे यांनी दिली.