उजनीतून सोलापूरला पाणी सोडणार?

By Admin | Updated: April 3, 2016 03:52 IST2016-04-03T03:52:19+5:302016-04-03T03:52:19+5:30

उजनी पाणलोट क्षेत्रातील पाणी कमी होत चालल्याने इंदापूर शहरासह, तालुक्यातील धरणालगतच्या गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. या पार्श्वभूमीवर सोलापूर

Ujani to leave water to Solapur? | उजनीतून सोलापूरला पाणी सोडणार?

उजनीतून सोलापूरला पाणी सोडणार?

इंदापूर : उजनी पाणलोट क्षेत्रातील पाणी कमी होत चालल्याने इंदापूर शहरासह, तालुक्यातील धरणालगतच्या गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. या पार्श्वभूमीवर सोलापूर शहरातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी उजनी धरणातून भीमा नदीद्वारे पाणी सोडण्याचे नियोजन करण्यात येत आहे. यासाठी विभागीय आयुक्तांच्या आदेशाची प्रतीक्षा आहे. तो आल्यानंतर येत्या चार ते पाच दिवसांत सुमारे साडेचार टीएमसी पाणी सोडण्यास सुरुवात होणार असल्याची शक्यता आहे. त्यासंदर्भात जोरदार प्रशासकीय तयारी सुरू आहे. त्यामुळे ‘दुष्काळात तेरावा महिना’ अशी इंदापूरकरांची अवस्था होणार असल्याचे चित्र आहे.
सोलापूर शहराला पिण्याच्या पाण्याची टंचाई भेडसावत आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या औज बंधाऱ्यात अत्यल्प पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे उजनी धरणातून शहराला पिण्यासाठी पाणी सोडण्याची मागणी होत आहे. उजनी धरणातील पाणीसाठ्याचा अंदाज घेऊन सोलापूरसाठी पाणी सोडण्याचे नियोजन करण्यात येत आहे.
सध्या उजनी धरणात वजा ३० टक्के इतका पाणीसाठा आहे.
सोलापूरच्या बंधाऱ्यात पाणी पोहोचेपर्यंत पाणी सोडले तर
४.५० टीएमसी पाणी सोडावे लागणार आहे. त्यासंदर्भात भीमा पाटबंधारे विभागाने नुकतीच एक बैठक घेऊन उपलब्ध पाणीसाठ्याचा आढावा घेण्यात आला. (वार्ताहर)

पाणी सुरक्षित पोहोचण्यासाठी नदीवर असलेल्या सर्व बंधाऱ्यांवर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. एका वेळी एका बंधाऱ्यावर २ पोलीस असे तीन पाळ्यांमध्ये ६ पोलीस कर्मचाऱ्यांची बंदोबस्तासाठी गरज लागणार आहे. त्या बंदोबस्तासह पाणी सोडण्याच्या खर्चासंदर्भातही या बैठकीत चर्चा झालेली आहे.

Web Title: Ujani to leave water to Solapur?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.