पुन्हा घडला कार्यक्रम रद्द करण्याचा प्रकार; आता सर्वजण गप्प का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:17 IST2020-12-05T04:17:23+5:302020-12-05T04:17:23+5:30
पुणे : टाटा लिटरेचर लाइव्ह फेस्टिव्हलमध्ये प्रसिद्ध लेखक नॉम चोम्स्की आणि पत्रकार विजय प्रसाद यांची होणारी ऑनलाइन चर्चा पर्यायाने ...

पुन्हा घडला कार्यक्रम रद्द करण्याचा प्रकार; आता सर्वजण गप्प का?
पुणे : टाटा लिटरेचर लाइव्ह फेस्टिव्हलमध्ये प्रसिद्ध लेखक नॉम चोम्स्की आणि पत्रकार विजय प्रसाद यांची होणारी ऑनलाइन चर्चा पर्यायाने त्यांचे निमंत्रणच रद्द करण्यात आले तरी सर्वजण गप्प का, असा संतप्त सवाल अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांनी उपस्थित केला आहे. या प्रकाराची साधी चर्चादेखील झाली नाही. मात्र यवतमाळच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संंमेलनाच्या वेळेस निरूपद्रवी मंडळी साहित्य महामंडळावर तुटून पडली होती याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे.
नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मुंबईमध्ये टाटा लिट फेस्टिव्हल आयोजित करण्यात आला होता. चोम्स्की यांच्या ‘इंटरनॅशनलिझम और एक्सटिंगशन’ या नव्या पुस्तकावर चर्चा होणार होती. मात्र त्यांना व प्रसाद यांना दुपारी मेल करून ही चर्चा रद्द केल्याचे कळवण्यात आले. या पुस्तकात काही मुद्दे वादग्रस्त असल्याने दोघांचे निमंत्रण रद्द झाल्याचे समजते. असाच काहीसा प्रकार यवतमाळ साहित्य संमेलनामध्येसुद्धा घडला होता. ज्येष्ठ साहित्यिक नयनतारा सहगल यांनादेखील पत्र पाठवून संमेलनाच्या उद्घाटनाला येऊ नका, असे आयोजकांनी सांगितले होते. मात्र आयोजकांच्या या कृतीचा सर्वत्र निषेध व्यक्त करण्यात आला. संमेलन काळात सर्व वातावरण ढवळून निघाले होते. मात्र याची पुनरावृत्ती होऊनही माध्यमांनी साधी दखलपण घेतली नसल्याची खंत ठाले-पाटील यांनी व्यक्त केली.
------
कोट
टाटांच्या आजपर्यंतच्या भूमिकेशी पूर्णपणे विसंगत असा हा निर्णय आहे. टाटांची प्रतिमा अशी कचखाऊ कधीच नव्हती. टाटा लिटरेचर फेस्टिव्हलचे डायरेक्टर अनिल धारकरच्या माध्यमातून कोणाला घाबरत आहेत? लोकांसमोर असलेला एक आदर्श या निर्णयामुळे ढासळत आहे. यापेक्षा संपूर्ण फेस्टिव्हलच रद्द केला असता तर ही नामुष्की तरी टळली असती.
- कौतिकराव ठाले-पाटील
अध्यक्ष, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ