दुचाकीची गॅरेज शेडच्या लोखंडी खांबाला धडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2020 04:05 IST2020-12-02T04:05:31+5:302020-12-02T04:05:31+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क लोणी काळभोर : मुळगावावरून मित्रासमवेत पनवेल येथे निघालेल्या टेक्निशियनने आपली दुचाकी महामार्गावर उभ्या असलेल्या ट्रकला ...

दुचाकीची गॅरेज शेडच्या लोखंडी खांबाला धडक
लोकमत न्यूज नेटवर्क
लोणी काळभोर : मुळगावावरून मित्रासमवेत पनवेल येथे निघालेल्या टेक्निशियनने आपली दुचाकी महामार्गावर उभ्या असलेल्या ट्रकला चुकवण्याच्या प्रयत्नात गॅरेज शेडच्या लोखंडी खांबाला धडकल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवरील दोघांचाही जागीच मृत्यू झाला. ही घटना सोमवारी पहाटेच्या सुमारास घडली.
विनायक अंबरूषी मोरे (वय ३७, रा. गणेगाव, ता.भुम, जि.उस्मानाबाद) आणि त्यांचा मित्र ईश्वर व्यंकटराव मुंगळे (वय २५, रा. हलगारा, ता. निलंगा, जि. लातुर) अशी या अपघातात मृत्यू झालेल्या दोन तरूणांची नावे आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरज बंडगर यांनी दिलेल्या माहितीनुसार मोरे हे नवी मुंबईत अंबरनाथ अैद्योगिक वसाहतीमध्ये सिप्ला कंपनीत टेक्निशियन म्हणून कामाला होते. रविवारी (दि २९) रात्री ९.३० च्या सुमारास विनायक मोरे हे दुचाकीने मित्र ईश्वर मुंगळे सोबत गणेगाव येेेथून पनवेलला निघाले होते. मध्यरात्री ते लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीत माळीमळा येथे आले. त्यावेळी सोलापूर - पुणे महामार्गावर जय भवानी गॅरेज समोर महामार्गालगत पाईप भरलेला ट्रक उभा होता. ट्रकला पाठीमागुन दुचाकी धडकू नये म्हणून मोरे यांनी तो ट्रक चुकवला व दुचाकी महामार्गाच्या खाली घेतली. परंतू दुर्दैवाने दुचाकीवरील ताबा सुटल्याने ते गॅरेजच्या शेडच्या लोखंडी खांबाला धडकले. या अपघातात दोघेही गंभीर जखमी झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. ससून रूग्णालयात उत्तरीय तपासणी नंतर दोन्ही मृतदेह त्यांचे ताब्यात देण्यात आले.