मुंढव्यात मद्यपींच्या हल्ल्यात दोन पोलीस जखमी

By Admin | Updated: May 19, 2014 00:24 IST2014-05-19T00:24:42+5:302014-05-19T00:24:42+5:30

मुंढवा पोलीस स्टेशन अंतर्गत रात्री गस्त घालणार्‍या पोलीस कर्मचार्‍यांवर चौघा जणांनी धारदार शस्त्रांनी हल्ला केल्याची घटना शनिवारी रात्री ११.३० वाजता श्रीनाथ म्हस्कोबा भाजी मार्केटजवळ घडली

Two policemen injured in drunken liquor attack | मुंढव्यात मद्यपींच्या हल्ल्यात दोन पोलीस जखमी

मुंढव्यात मद्यपींच्या हल्ल्यात दोन पोलीस जखमी

घोरपडीगाव : मुंढवा पोलीस स्टेशन अंतर्गत रात्री गस्त घालणार्‍या पोलीस कर्मचार्‍यांवर चौघा जणांनी धारदार शस्त्रांनी हल्ला केल्याची घटना शनिवारी रात्री ११.३० वाजता श्रीनाथ म्हस्कोबा भाजी मार्केटजवळ घडली. यामध्ये दोन पोलीस कर्मचारी जखमी झाले असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे घोरपडी परिसराला छावणीचे स्वरूप येऊन एक जणाला पोलिसांनी अटक केले आहे. याबाबत अधिक माहिती अशी, की मुंढवा पोलीस स्टेशनचे कॉन्स्टेबल पद्माकर भानुदास शेलार (वय ४८) व साहेबराव कोडद (वय ४७) हे नेहमीप्रमाणे रात्री मोटारसायकलवरून गस्त घालत होते. श्रीनाथ म्हस्कोबा भाजी मार्केटजवळ चौघे जण दारू पितांना आढळून आले. त्यांनी त्या चौघांना हटकले. तेव्हा चौघांनी धारधार हत्याराने त्यांच्यावर वार करण्यास सुरुवात केली. यात पद्माकर शेलार यांच्या डाव्या हातावर, तर साहेबराव एकनाथ कोडग यांच्या पाठीवर व डोक्याला मार लागला आहे. त्यांनी लगेच वॉकीद्वारे कंट्रोल रूमला याबाबत संदेश दिला व तत्काळ पोलीस घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान, आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला होता. घटनास्थळी अनेक वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनी भेट देऊन पाहणी केली. तर, संपूर्ण रात्रभर गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या लोकांची धरपकड सुरू होती. अखेर घोरपडीगाव येथील विकासनगर येथील राजेंद्र महेंद्र नायक (वय २२) याला ताब्यात घेण्यात आले असून, इतर तीन आरोपींचा शोध सुरू आहे. (वार्ताहर)

Web Title: Two policemen injured in drunken liquor attack