नसरापूर (पुणे) : प्रवासी म्हणून टेम्पोत बसलेल्या दोन जणांनी टेम्पो चालकाला चाकूचा धाक दाखवून टेम्पो व त्यामधील इलेक्ट्रिक ट्रान्सफॉर्मरची लूटमार करून सारोळा (ता. भोर) येथे विक्रीसाठी आणलेला ४ लाख ८० हजारांचा मुद्देमाल किकवी पोलिसांनी मोठ्या शिताफीने पुणे - सातारा महामार्गावर पाठलाग करून पकडला आहे. या प्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली असून, चोरीतील ट्रान्सफॉर्मरची विक्री चोरटे नेमके कोणाला करणार होते, याचा तपास सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, परशुराम सुनील बरकडे (वय २३), राजू बाळासाहेब चोरमले (वय १९) (दोन्ही रा. पिसुर्टी, ता. पुरंदर) अशी संशयित आरोपींची नावे आहेत. ही घटना सातारा जिल्ह्यातील देऊर येथील रेल्वे फाटक (ता. कोरेगाव) येथे रात्रीच्या वेळी घडली होती. या घटनेबाबत वाठार पोलिस स्टेशन येथे टेम्पोचालक बलभीम नानासो मदने (रा. झारगडवाडी, ता. बारामती) यांनी फिर्याद दिली होती. सारोळा (ता. भोर) येथे मंगळवार, २० जून रोजी किकवी पोलिसांनी टेम्पो (क्र. एमएच ४२ - एक्यू ५६७३) मुद्देमाल व आरोपींना पकडले.
घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी तानाजी बर्डे, पोलिस निरीक्षक सचिन पाटील यांनी भेट दिली. मुद्देमाल व आरोपींना वाठार पोलिस स्टेशनचे तपासी अधिकारी उपनिरीक्षक संदीप बनकर यांच्या ताब्यात देण्यात आले.
याबाबत अधिक माहिती अशी की, सातारा जिल्ह्यातील एका कंपनीतील ट्रान्सफॉर्मर दुरुस्तीसाठी बारामतीमध्ये नेत असताना वाहतूक करणाऱ्या टेम्पोत देऊर रेल्वे फाटक येथे प्रवासी म्हणून चोरटे बसले होते. काही अंतर पुढे गेल्यावर चोरट्यांनी टेम्पोचालक बलभीम मदने यांना चाकूचा धाक दाखवून पळवून लावले. मुद्देमालाची सारोळा व नसरापूर परिसरातील येथील भंगार दुकानदारांना विक्री करणार असल्याची चोरट्यांनी कबुली दिली असून, उपविभागीय पोलिस अधिकारी तानाजी बर्डे, पोलिस निरीक्षक सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक नितीन खामगळ, पोलिस नाईक मयूर निंबाळकर, नाना मदने, योगेश राजीवडे यांनी यशस्वी कारवाई केली आहे.