इंदापूरमध्ये दोन महिन्यांचे नियोजन
By Admin | Updated: May 5, 2016 04:31 IST2016-05-05T04:31:51+5:302016-05-05T04:31:51+5:30
खडकवासला कालव्याचे पाणी येत्या सहा दिवसांत इंदापूर तालुक्यातील तरंगवाडी तलावात पोहोचेल. दोन महिने पुरेल एवढे पाणी साठविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. पाणीचोरीला आळा

इंदापूरमध्ये दोन महिन्यांचे नियोजन
इंदापूर : खडकवासला कालव्याचे पाणी येत्या सहा दिवसांत इंदापूर तालुक्यातील तरंगवाडी तलावात पोहोचेल. दोन महिने पुरेल एवढे पाणी साठविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. पाणीचोरीला आळा घालण्यासाठी भरारी पथक नेमण्यात आले आहे, अशी माहिती खडकवासला प्रकल्प सिंचन व्यवस्थापन उपविभाग इंदापूरचे उपविभागीय अभियंता के. के. देवकाते यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
देवकाते म्हणाले, ‘‘मागील उन्हाळी पाणी आवर्तनात इंदापूरला १.६ टीएमसी पाणी सोडण्यात आले होते. या वेळी इंदापूर, दौंड व हवेली या तालुक्यांसाठी एकूण १ टीएमसी पाणी दिले जाणार आहे. नवीन मुठा कालव्यातून शेटफळ गढे, निरगुडे मार्गे तरंगवाडी तलावात पाणी येईल. तलावातील पाणी लगतच्या इंदापूर नगर परिषद, तरंगवाडी, गोखळी, विठ्ठलवाडी, झगडेवाडी या गावांना व विद्या प्रतिष्ठान, कृषी उत्पन्न बाजार समिती या संस्थांना देण्यास प्राधान्य दिले जाईल. यातून शक्य झाल्यास ते पाणी खडकवासला कालव्याच्या परिसरातील कवठळी, बळपुडी, न्हावी, रुई, कळस, गोसावीवाडी, अकोले, निरगुडे, शेटफळगढे, पिंपळे या भागाला दिले जाईल.
पाणी आल्यानंतर त्याची चोरी होऊ नये, यासाठी जलसंपदा विभागाचे पुण्याचे उपकार्यकारी अभियंता धोडपकर यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथकाची नेमणूक करण्यात आली आहे. या पथकात ३ पोलीस अधिकारी, १५ पोलीस कर्मचारी, महावितरण कंपनीचे ३ अधिकारी, पाटबंधारे विभागाचा १ कार्यकारी अभियंता, २ उपविभागीय अधिकारी, ८ शाखा अभियंते आदींचा समावेश करण्यात आला आहे. पाणीचोरी करताना आढळणाऱ्या व्यक्तीवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल. सायफन, विद्युत पंपदेखील कारवाईतून सुटणार नाहीत.’’
‘पंपांचा वीजपुरवठा खंडित करा’
तालुक्यात पाणी आल्यानंतर खडकवासला कालव्यालगतच्या भागातील विद्युत पंपांचा वीजपुरवठा खंडित करण्याच्या सूचना महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. कालव्यांच्या दारांची दुरुस्ती करून घेण्यात आली आहे, असे देवकाते यांनी स्पष्ट केले.