पुण्यातील मद्यधुंद पर्यटकांच्या चाकू हल्ल्यात दोघे जखमी
By Admin | Updated: March 14, 2016 00:17 IST2016-03-13T23:47:45+5:302016-03-14T00:17:43+5:30
आठ अटकेत : विवस्त्र होऊन धिंगाणा; केळशी समुद्रकिनाऱ्यावरील घटना

पुण्यातील मद्यधुंद पर्यटकांच्या चाकू हल्ल्यात दोघे जखमी
दापोली : समुद्रात स्नानासाठी विवस्त्र उतरून पुण्यातील पर्यटकांनी मद्यधुंद अवस्थेत धिंगाणा घालण्याचा प्रकार दापोली तालुक्यातील केळशी समुद्रकिनाऱ्यावर रविवारी सायंकाळी घडला. हा धिंगाणा पाहून संतप्त झालेल्या स्थानिक ग्रामस्थांनी त्यांना अटकाव करताच त्यांच्यावर या पर्यटकांनी धारदार हत्याराने हल्ला केला. यामध्ये दोघे शिक्षक जखमी झाले असून, पोलिसांनी पुण्यातील आठ पर्यटकांना अटक केली आहे.
ऋषिकेश राजेंद्र नवगणे (वय २५, धनकवडी), प्रतिक शांतीलाल मुनोत (१७), सूरज सतीश काकडे (१९), ओंकार भरत काळे (१७), अनुस बनतोडे (१७), अक्षय सुर्यकांत खुटवड (२६), तन्मय बाळकृष्ण पोमण (१९, सर्व रा. महर्षीनगर, पुणे) व सिद्धांत मधुकर घाडगे (१९, निगडी, पुणे) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
केळशी येथील समुद्रकिनाऱ्यावर रविवारी पुणे येथून काही पर्यटक आले होते. मद्यधुंद अवस्थेत त्यांनी किनाऱ्यावर धिंगाणा घालण्यास सुरुवात केली. अंगावरील सर्व वस्त्र काढून ते समुद्रात स्नानाला उतरले. हा प्रकार पाहून केळशी येथील स्थानिक ग्रामस्थ सारिक साबीर शेख, मन्सूर फाते हे दोघेजण त्या पर्यटकांना समज देण्यासाठी गेले. अशा प्रकारचे गैरवर्तन करणे चालत नाही, तुम्हाला विवस्त्र अवस्थेत समुद्रकिनाऱ्यावर फिरू देणार नाही, अशी समज देताच पर्यटकांचा पारा आणखीन चढला. या पर्यटकांनी स्थानिकांना अर्वाच्च शिवीगाळ केली. शिवीगाळ करीतच पर्यटकांनी झायलो गाडीतील चॉपर आणि चाकू काढून स्थानिकांवर हल्ला केला. चाकूहल्ल्यानंतर या दोघांनी आरडाओरडा केला असता किनाऱ्याशेजारील स्थानिक ग्रामस्थ मदतीला धाऊन आले आणि पर्यटक पळून जाण्याच्या आत त्यांना पकडले. (प्रतिनिधी)