कंटेनर ट्रकवर कोसळून दोन जखमी
By Admin | Updated: January 8, 2015 00:18 IST2015-01-08T00:18:30+5:302015-01-08T00:18:30+5:30
पेट्रोलपंपामध्ये उभ्या असलेल्या ट्रकवर चालकाचे नियंत्रण सुटलेला भरधाव कंटेनर उलटला.

कंटेनर ट्रकवर कोसळून दोन जखमी
पेट्रोल पंपावर थरार : डिझेलगळती
झाल्याने भीतीचे वातावरण
पुणे : पेट्रोलपंपामध्ये उभ्या असलेल्या ट्रकवर चालकाचे नियंत्रण सुटलेला भरधाव कंटेनर उलटला. हा अपघात बुधवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास खडी मशीन चौकातील धर्मावत पेट्रोलपंपावर झाला. अपघातानंतर ट्रकच्या इंधनाची टाकी फुटून सगळीकडे डिझेल पसरले होते. त्यामुळे आग लागण्याची शक्यता निर्माण झाली होती. परंतु अग्निशामक दलाच्या जवानांनी सावधपणे बचावकार्य करुन ट्रकमध्ये झोपलेल्या दोघांची सुटका केली.
फायरमन शफिक सय्यद यांनी दिलेल्या माहितीनुसार, धर्मावत पेट्रोलपंपामध्ये ट्रक उभी करुन चालक आणि क्लिनर आतमध्ये झोपलेले होते. सकाळी साडेसहाच्या सुमारास एक कंटेनर भरधाव वेगात पंपामध्ये घुसला. कंटेनर चालकाला झोप अनावर झाल्यामुळे त्याचे नियंत्रण सुटले. हा कंटेनर वळण घेत असतानाच ट्रकवर उलटला. ट्रकच्या पुढील भागासह पाठीमागील भागही चेपला. आतमध्ये दोघेजण अडकल्याची माहिती मिळताच अग्निशामक दलाचे स्टेशन आॅफीसर रामटेके, अनिल गायकवाड, तांडेल पायगुडे, जवान शफीक सय्यद, सचिन जवंजाळे, अजित बेलोसे, छगन मोरे, प्रसाद वाळुंजकर, खाडे, माळवदकर, वसंत भिलारे, सपकाळ यांनी घटनास्थळी धाव घेतली.
ट्रकची टँक फुटल्याने सर्वत्र डिझेल पसरलेले होते. पेट्रोल खाली करण्यासाठी एक टँकरही येऊन उभा होता. बचावकार्य करताना ठिणग्यांमुळे आग लागण्याची शक्यता गृहीत धरुन हा टँकर बाहेर काढण्यात आला.
त्यानंतर ट्रकच्या समोरील बाजुच्या काचा फोडून आतमध्ये प्रवेश करण्यात आला. कटरच्या सहाय्याने दरवाजा तोडून दोन जखमींना बाहेर काढण्यात आले. एकाच्या पायाला गंभीर जखमा झालेल्या होत्या. कोंढवा पोलिसांनी कंटेनर चालकाला ताब्यात घेतले आहे.(प्रतिनिधी)