लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : पीएमपी बसमधील गर्दीचा फायदा घेऊन प्रवाशांची पाकिटे, महिलांच्या पर्समधील दागिने, रोख रक्कम चोरुन नेण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढ होत आहे. पीएमपी बसमध्ये गर्दीचा फायदा घेउन चोरट्यांनी ज्येष्ठ नागरिकाकडील रोकडसह महिलेचे दागिने लंपास केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी खडक आणि स्वारगेट पोलीस ठाण्यात स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
रशिद नायब (वय ६३, रा. लोहियानगर, गंजपेठ) हे शनिवारी सकाळी सेवन लव्हज चौक बस स्टॉपवरून बसने प्रवास करीत होते. यावेळी बसमधील गर्दीचा फायदा घेऊन त्यांच्या पँटच्या खिशातील १८ हजार रुपयांची रोकड दोघा चोरट्यांनी चोरून नेली. हा प्रकार नायब यांच्या लक्षात आला. याप्रकरणी खडक पोलिसांनी वसंत विजय जाधव (वय ३६, रा. सर्वोद्य कॉलनी, मुंढवा) याला अटक केली असून त्याच्या साथीदाराचा शोध घेतला जात आहे. पोलीस हवालदार अर्जुन कांबळे तपास करीत आहेत.
दुसरी घटना जुनी सांगवी ते स्वारगेट बस स्टँड दरम्यान शनिवारी दुपारी साडेतीन ते चार वाजण्याच्या दरम्यान घडली. शिरूर येथील एक ३२ वर्षांची महिला जुनी सांगवी येथील ढोरेनगर बसस्टॉपवरून स्वारगेटला जाण्यासाठी बसमध्ये बसल्या. प्रवासादरम्यान चोरट्याने त्यांच्या पर्समधील मोबाईल, सोन्याचे गंठण व ५ हजार रुपये रोख असा ४० हजार रुपयांचा ऐवज चोरी करुन नेला. स्वारगेटला बसमधून उतरल्यावर चोरीचा हा प्रकार त्यांच्या लक्षात आला. स्वारगेट पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक ए. एस. लोहाेटे तपास करीत आहेत.