जगताप मळ्यात दोन गटांत हाणामारी
By Admin | Updated: August 9, 2015 03:32 IST2015-08-09T03:32:10+5:302015-08-09T03:32:10+5:30
ग्रामपंचायत निवडणूक निकालानंतरचे पडसाद हवेली तालुक्यातही उमटू लागले आहे. तरडे येथील जगताप मळ्यात एकाच भावकीतील पराभूत व विजयी उमेदवारांच्या दोन गटांत झालेल्या वादाचे

जगताप मळ्यात दोन गटांत हाणामारी
लोणी काळभोर : ग्रामपंचायत निवडणूक निकालानंतरचे पडसाद हवेली तालुक्यातही उमटू लागले आहे. तरडे येथील जगताप मळ्यात एकाच भावकीतील पराभूत व विजयी उमेदवारांच्या दोन गटांत झालेल्या वादाचे पर्यवसान भांडणात झाले असून, दोन्ही बाजूने लोखंडी पाईप, सळ्या, काठ्या, दगड यांचा वापर करण्यात आल्याने दोन्ही गटांचे तीन महिलांसह एकूण आठ जण जखमी झाले आहेत.
पोलीस निरीक्षक बी. ए. कोंडूभैरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकार शुक्रवारी (दि. ७) दुपारी ३.३० ते ४ च्या सुमारास तरडे येथील जगताप मळा येथे घडला. या प्रकरणी दोन्ही गटांनी परस्परविरोधी तक्रारी दिल्या असून, २७ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यातील शरद शिवाजी जगताप, (वय ३५), विलास नामदेव जगताप ( ४८), पंकज अशोक जगताप (३१), सोनबा शिवाजी जगताप (३८), वैभव विलास जगताप (२०), अशोक नामदेव जगताप (४६), स्वप्नील अशोक जगताप (१९) व नवनाथ बाळासाहेब जगताप (३४, सर्व रा. जगताप मळा, तरडे, ता. हवेली) या आठ जणांना अटक करण्यात आली आहे.
नवनाथ बाळासाहेब जगताप यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार ६ आॅगस्ट रोजी दुपारी १२ च्या सुमारास त्यांचा भाऊ प्रेमदास यांस शिवाजी जगताप याने फोन करून, तुम्ही मतदान न केल्याने मी पराभूत झालो, असे म्हणून जिवे मारण्याची धमकी दिली होती.
त्यानंतर ७ आॅगस्ट रोजी दुपारी ४च्या सुमारास त्यांच्या भावकीतील नितीन शिवाजी जगताप, शरद शिवाजी जगताप, विलास नामदेव जगताप हे गज घेऊन, अशोक नामदेव जगताप, पंकज अशोक जगताप, शिवाजी नामदेव जगताप यांनी काठी, सोनबा शिवाजी जगताप व स्वप्निल अशोक जगताप हे दगड घेऊन इतर सहा जणांना घेऊन आले व त्यांनी बाळासाहेब बाबूराव जगताप,
प्रेमनाथ व नवनाथ यांच्यासमवेत नवनाथ यांच्या पत्नी मनीषा, वहिनी स्वाती यांना मारहाण केली. हे सर्व जण ससूण रुग्णालय पुणे येथे उपचार घेत आहेत. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक अनिल गोपाळ करत आहेत.
(वार्ताहर)