पोखरी घाटात दोन भाविक ठार
By Admin | Updated: November 13, 2016 04:19 IST2016-11-13T04:19:40+5:302016-11-13T04:19:40+5:30
मंचर-भीमाशंकर रस्त्यावर पोखरी घाटात लक्झरी बसला झालेल्या भीषण अपघातात दोन जण ठार, तर ३६ जखमी झाले. भीमाशंकराचे दर्शन घेऊन शनिशिंगणापूरकडे जात

पोखरी घाटात दोन भाविक ठार
घोडेगाव : मंचर-भीमाशंकर रस्त्यावर पोखरी घाटात लक्झरी बसला झालेल्या भीषण अपघातात दोन जण ठार, तर ३६ जखमी झाले. भीमाशंकराचे दर्शन घेऊन शनिशिंगणापूरकडे जात असताना शुक्रवारी (दि. ११) ११.३०च्या सुमारास घाटातील अवघड वळणार चालकाचा वेगावर ताबा न राहिल्याने हा अपघात घडला.
ओडिशा येथून आलेले प्रफुल्लकुमार शाहू (वय ४०, रा. आडसिनीदा, ता. जाचपूर) व ममता ब्रजबंद मिश्रा (वय ४५, रा. न्यू कॉलनी, ता. देवगड) या भाविकांचा या घटनेत मृत्यू झाला. २ नोव्हेंबर रोजी ओडिशा येथून ८२ भाविक तीर्थयात्रा दर्शनासाठी निघाले होते. राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरातमधील तीर्थक्षेत्रे करून पुणे येथे शुक्रवारी (दि. ११) सकाळी रेल्वेने पोहोचले. पुण्याहून दोन खासगी ट्रॅव्हल बसद्वारे भीमाशंकरकडे निघाले. भीमाशंकराचे दर्शन घेऊन शनिशिंगणापूर व शिर्डी करून दि. १४ रोजी पुन्हा ते पुरीला जाणार होते.
भीमाशंकराचे दर्शन घेऊनन जात असताना दि. ११ रोजी मध्यरात्री साडेअकराच्या सुमारास पोखरी घाटातील अवघड वळणावर चालकाचे वेगावरील नियंत्रण सुटल्याने लक्झरी गाडी (एमएच ४३-एच १०३५) रस्त्यातच पलटी झाली. यामध्ये मागील बाकड्यावर बसलेल्या दौघांचा जागीच मृत्यू झाला. तर, खिडकीच्या बाजूला बसलेल्या भाविकांना जबर मार लागला. अपघात घडताच जवळच असलेल्या गेंगजेवाडी येथील तरुण येथे आले. त्यांनी रस्त्याने जाणारे संतोष दांगट व संतोष गेंगजे यांच्या गाडीमधून जबर जखमी झालेल्या भाविकांना घोडेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात हलविले. घटनास्थळी मदत कार्यासाठी गेंंगजेवाडी येथील सोमनाथ गेंगजे, संदीप गेंगजे, प्रमोद गेंगजे, पुनाजी गेंगजे, किशोर गेंगजे तसेच
बाजार समितीचे माजी सभापती प्रकाश घोलप, सिद्धेश काळे,
जिगर बोऱ्हाडे, सूरज घोलप यांनी खूप मदत केली.
या दोन गाड्यांपैकी एक पुढे निघून गेली होती. सुमारे २० किलोमीटर पुढे गेल्यानंतर त्यांना आपल्या मागची गाडी दिसत नसल्याचे जाणवले. चालकाने फोन केला असताना घाटात गाडीला अपघात झाल्याचे समजले व गाडी पुन्हा घाटाकडे रवाना झाली.
गेंगजेवाडी येथील तरुणांनी घोडेगाव पोलीस ठाण्यात कळविताच सहायक पोलीस निरीक्षक मारुती खेडकर व पोलीस फौजदार किरण भालेकर तत्काळ घटनास्थळी पोहोचले. त्यांनी रुग्णवाहिका बोलावून उर्वरित जखमींना घटनास्थळावरून घोडेगाव ग्रामीण रुग्णालयात हलविले. सर्व ३६ जखमींवर येथे प्रथमोपचार करण्यात आले. यांतील ६ गंभीर जखमींना मंचर येथील ग्रामीण रुग्णालयात, तर ८ गंभीर जखमींना पुण्यातील ससून रुग्णालयात उपचारांसाठी हलविण्यात आले. (वार्ताहर)
जखमी भाविक ...
अन्नपूर्णा पांडा, पवित्र मोहन महालिक, सुजाता मोहंती, रेवती महापात्रा, शारदा पवित्र महालिंग, वीणापाणी त्रिपाठी, मीनाराणी शशिभूषण प्रधान, संतोष कुमार मोहंती, कल्पना वासुदेव सत्पथी, वनमाली पांडा, ज्योती मंदोरी माझी, बिरोजचंद्र लिंगराज दास, रामचंद्र त्रिपाठी, विजयालक्ष्मी त्रिपाठी, भगवती दास, रमाकांत प्रधान, बटाकृष्ण रावेत, दांडिबा साहू, घनश्याम साहू, टिनो साहू, शांती बटुकेश्वर, सरोजिनी राज, गंगाधर दास, मंजुळा दास, घनश्याम दास, शकुंतला शशिपलई, सुखदेव दास, शशी विलई, अच्युतानंद करुणाकर, संज्योता पाणी, भुंज पांडा, रामचंद्र साहू, गौयंगीनी चंद्रा, हिनो साहू, सनाधन अच्युतानंद, ऊर्मिला सनाधन यांचा समावेश होता.
कठड्यामुळे टळली मोठी दुर्घटना
पोखरी घाटात कडेला लावण्यात आलेल्या लोखंडी साईड गार्डमुळे गाडी वाचली; अन्यथा गाडी डोंगरावरून खाली सुमारे पाचशे ते सहाशे फूट खोल गेली असती. या साईड गार्डने गाडी घाटातून खाली जाता-जाता वाचवली.
अपघातात हे साईड गार्ड पूर्ण
तुटून मोडून गेले आहे. अपघात टाळण्यासाठी घाटात ठिकठिकाणी असे लोखंडी साईड गार्ड बसविले जावेत, अशी मागणी जवळच्या ग्रामस्थांनी केली आहे.
दोन मृतांपैकी ममता मिश्रा यांचा अंत्यविधी घोडेगावमध्येच करण्यात आला. या अंत्यविधीसाठी व या भाविकांना वेगवेगळ्या प्रकारची मदत घोडेगाव ग्रामस्थ व सहानभुती सेवाभावी संस्थेने केली. संस्थेचे अध्यक्ष श्रीकांत गाढवे यांनी सर्व भाविकांची चहा, नाष्टा व जेवणाची व्यवस्था केली. घोडेगाव ग्रामस्थांनी केलेले सहकार्य व मदत पाहून या भाविकांनी त्यांचे आभार मानले.