भीषण अपघातात कोंढापुरीत दोन ठार
By Admin | Updated: September 15, 2015 04:34 IST2015-09-15T04:34:38+5:302015-09-15T04:34:38+5:30
कोंढापुरी (ता. शिरूर) येथे पुणे-नगर महामार्गावर प्रवासी बसने पायी चालणाऱ्या युवकांना उडविल्याने झालेल्या अपघातात २ जण ठार, तर ३ जण गंभीर जखमी झाले असल्याची

भीषण अपघातात कोंढापुरीत दोन ठार
रांजणगाव गणपती : कोंढापुरी (ता. शिरूर) येथे पुणे-नगर महामार्गावर प्रवासी बसने पायी चालणाऱ्या युवकांना उडविल्याने झालेल्या अपघातात २ जण ठार, तर ३ जण गंभीर जखमी झाले असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
कोंढापुरी गावाच्या हद्दीत सोमवारी (दि. १४) पहाटेच्या सुमारास हा भीषण अपघात झाला. याबाबत रांजणगाव पोलिसांनी दिलेली माहिती अशी, कोंढापुरी येथील ९ युवक रांजणगाव येथे श्रीमहागणपतीच्या दर्शनाला गेले होते. दर्शन करून पहाटेच्या सुमारास घरी येत असताना पाठीमागून नगरहून पुण्याकडे येणाऱ्या प्रवासी बसने (एमएच १४, सीडब्ल्यू ३१३८) त्यांना उडविले.
या अपघातात सूरज पोपट नरवडे (वय १५) व भूषण प्रकाश चव्हाण यांना हातापायाला गंभीर दुखापत झाल्याने ते मयत झाले, तर चेतन मच्छिंद्र गायकवाड, वैभव अशोक कारकुड आणि अनिकेत अनिल अडसूळ हे ३ युवक जबर जखमी झाले आहेत. त्यांना खासगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत.
या अपघाताबद्दल प्रवासी बसचालक ईश्वर एकनाथ सुरसे (वय ४२, रा. हडको, नवीन नांदेड) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या अपघाताचा तपास सहायक पोलीस निरीक्षक सुनील क्षीरसागर तपास करीत आहेत. या अपघातामुळे कोंढापुरी गावावर शोककळा पसरली आहे. (वार्ताहर)