खोटे बक्षीसपत्र बनवून दोन एकर बळकावली
By Admin | Updated: March 27, 2015 23:19 IST2015-03-27T23:19:33+5:302015-03-27T23:19:33+5:30
शिक्के बनवून खोटे बक्षीसपत्र तयार करून दोन एकर जमीन हडप करण्याचा प्रकार वडकी (ता. हवेली) येथे उघडकीस आला. हा प्रयत्न करणाऱ्या तिघांपैकी एकाला अटक करण्यात आली आहे.

खोटे बक्षीसपत्र बनवून दोन एकर बळकावली
लोणी काळभोर : मूळ मालक हयात असताना त्याच्या क्षेत्रास बाधा आणण्याच्या हेतूने बनावट बक्षीसपत्राचा दस्तऐवज तयार करून व त्यासाठी लागणारे शिक्के बनवून खोटे बक्षीसपत्र तयार करून दोन एकर जमीन हडप करण्याचा प्रकार वडकी (ता. हवेली) येथे उघडकीस आला. हा प्रयत्न करणाऱ्या तिघांपैकी एकाला अटक करण्यात आली आहे.
विशाल सुरेश आगरवाल (रा.२७, सोमवार पेठ, कपूर हाईट्स, माळीमहाराज मठाजवळ, पुणे) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, फसवणुकीचा हा प्रकार दलप्रताप सूर्यभानसिंग ठाकूर (वय ११ वर्षे, रा. ८२१, चिंतामणी हॉस्पिटलजवळ, पुणे), मयूर उत्तम मोडक (वय २२, रा. वडकी) व वडकी गावचे कोतवाल नामदेव बाबूराव शिंदे यांनी केला आहे. तिघांपैकी मयूर मोडक याला अटक करण्यात आली आहे.
सुरेश आगरवाल यांचे वडील सुरेश बाबूलाल आगरवाल, त्यांचे नातेवाईक रमेशचंद्र शिवविलास तिवारी (रा. ५२०, रास्ता पेठ, पुणे) व अमरजितसिंग मानसिंग कौचर (रा. ९४५, रविवार पेठ पुणे) या तिघांनी १९९८ साली वडकी गावातील जमीन गट क्रमांक १२५३ क्षेत्र १ हेक्टर ५३ आर पैकी ८० आर (दोन एकर) क्षेत्र चंद्रकात गेणबा मोडक व इतर सहा जणांकडून कायदेशीर खरेदीखत करून विकत घेतले होते. त्यानंतर सुरेश आगरवाल हे १ मे २०११ रोजी मयत झाले. परंतु, त्यांच्या मुलांनी वारसाहक्काने त्यांची नोंद केलेली नव्हती.
सुरेश आगरवाल हे दि. ४ मार्च २०१५ रोजी बुधवार पेठ येथील आपल्या दुकानात होते. त्या वेळी पोस्टमनने त्यांच्या वडिलांचे नाव असलेले रजिस्टर टपाल दिले. त्यामधे सुरेश आगरवाल, रमेशचंद्र तिवारी, अमरजितसिंग कोचर यांनी दलप्रताप ठाकूर यांना १३ एप्रिल १९९९ रोजी बक्षीसपत्र करून दिलेल्या दस्ताबाबत तुमची काही तक्रार असल्यास तुम्ही सात दिवसांच्या आत हरकत घ्यावी, असे नमूद करण्यात आले होते.
सदर नोटीस मिळताच ७ मार्च रोजी हवेलीच्या तहसीलदारांचे
पत्र घेऊन आगरवाल हे तिवारी व कोचर यांचे समवेत वडकी गावच्या तलाठी पुष्पा गोसावी व कोतवाल नामदेव शिंदे यांना भेटले. त्या वेळी शिंदे यांनी त्यांच्याकडे नोंदणीसाठी आलेले बक्षीसपत्राचे दस्तऐवज पाहण्यासाठी झेरॉक्स दिली. त्यानंतर तिघांनी हडपसर मेगा सेंटर येथील हवेली सब रजिस्ट्रार आॅफिसमध्ये जाऊन बक्षीसपत्राची कायदेशीर प्रत घेतली.
त्यामधे वडकी तलाठ्याकडे नोंदणीसाठी आलेले बक्षीसपत्र क्रमांक ३८३/१/९९ हे बक्षीसपत्र लिहून घेणार दलप्रताप ठाकूर हे बक्षीसपत्र खोटे असून, त्या ठिकाणी लिहून घेणार राजेंद्र महातू शितोळे (रा.कोंढवा खुर्द, मिठानगर, पुणे) व लिहून देणार सोमनाथ किसन फुल्लेलु (रा.अहमदनगर) यांची येवलेवाडी येथील जमीन गट क्रमांक ३५ हिस्सा नंबर २०/०८ क्षेत्र ०१ आर चे असलेबाबत खात्री झाली. तसेच त्यांचे बक्षीसपत्र लिहिलेला १०० रुपयांच्या स्टॅम्पवर दुय्यम निबंधक हवेली क्रमांक ३, दशरथ एल. शिंदे, पुणे जिल्हा रजिस्टर नंबर ९०८४ व क्रमांक ५७ मुख्य महानगर दंडाधिकारी मुंबई दि. १३/४/९९ असे वेगवेगळ्या ठिकाणचे शिक्के निदर्शनास आले. त्या वेळी सदर बक्षीसपत्र बनावट व खोटे असल्याची त्यांची खात्री झाली.
या जागेच्या तीनही मूळ मालकांनी सदर जमिनीचे बक्षीसपत्र अद्याप कोणत्याही व्यक्तीस दिलेले नसून खोटे बक्षीसपत्र झाल्याने त्याची नोंद करण्यात येऊ नये, असा तक्रार अर्ज दिला. (वार्ताहर)
बक्षीसपत्र कसे प्राप्त झाले, याबाबत वडकीच्या तलाठ्यांकडे चौकशी केली असता, त्यांनी कोतवाल नामदेव शिंदे याच्याकडे त्यांच्या ओळखीचा मयूर मोडक याने दिले व त्यावरून कायदेशीर नोटीस बजावण्यात आली. त्यामुळे फसवणुकीचा हा प्रकार उघडकीस आला असल्याचे त्यांनी सांगितले.